- मनोहर कुंभेजकरमुंबई - माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतदार असलेल्या राम नाईक यांनी प्रवास खर्च तसेच सुरक्षाव्यवस्थेवर पडणारा ताण टाळण्यासाठी टपाली मतदानाद्वारे मतदान केले. उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल राम नाईक हे मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातील मतदार आहेत. गोरेगाव ( पूर्व )गोकुळधाम येथील लक्षचंडी अपार्टमेंटमध्ये राम नाईक यांचे निवासस्थान आहे. /येथील मतदान हे येत्या 29 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र मतदानासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत येण्याऐवजी दि, 24 रोजीच राम नाईक व त्यांच्या पत्नी कुंदा नाईक यांनी लखनौ येथे मतदान करून ते टपालाने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविले आहे. राज्यपाल व त्यांच्या पत्नी यांना घटनेने विशेष मतदाराचा दर्जा दिला असल्याने ते टपालानेही मतदान करू शकतात. लखनौहून मुंबईला येऊन जाण्यासाठी किमान एक दिवस तर जातोच. शिवाय त्या दोघांसह, एडीसी यांचा विमान प्रवास खर्च रु.1,27,000 येतो. राम नाईक यांना उच्च दर्जाची झेड सुरक्षा असल्याने सर्व सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांचा प्रवास खर्चही होतो.याखेरीज स्थानिक प्रशासनावरही ऐन मतदानाच्यावेळी राज्यपालांच्या भेटीच्या झेड सुरक्षा व्यवस्थेचा ताण येतो. हे सर्व टाळण्यासाठी राज्यपाल राम नाईक यांनी टपालाने मतदान करण्याचा निर्णय घेतला. मतदान हा राष्ट्रधर्म असून आपले मतदान वेळेवर मुंबईत पोहचावे यासाठी मतदान करून टपालाने पत्रिका पाठवित असल्याचे राम नाईक यांनी सांगितले. राजभवनचे अप्पर मुख्य सचिव हेमंत राव यांनी राम नाईक व कुंदा नाईक या दोघांच्या मतपत्रिकांवर साक्षीदार अधिकारी म्हणून साक्षांकन केले.
गोरेगाव प्रवासी संघाचे स्थापनाकार व गोरेगावकरांशी ऋणानुबंध जपणारे राम नाईक हे एक उत्कृष्ट संसदपटू व लोकशाही जपणारे व जगणारे गोरेगावमधील सर्वमान्य व्यक्तिमत्व .त्यांनी लोकशाही प्रक्रियेचा अतिशय खोलात जाऊन अभ्यास केल्यामुळे लोकशाही पद्धतीतील खाचा खोचा ते चांगल्या तऱ्हेने जांणतात याचाच एक नमुना त्यांनी लखनौ येथे राज्यपालपदाचा कार्यभार सांभाळताना मुंबईतील आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन आपला मतदानाचा हक्क बजावला .
रामभाऊ या टोपण नावाने त्यांच्या तमाम चाहत्यांमध्ये व गोरेगावकरांमध्ये त्यांची ओळख आहे.त्यांनी आपल्या कृतीने त्यांनी सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला व त्यामुळेच गोरेगाव प्रवासी संघाला त्यांचा रास्त अभिमान वाटतो.त्यांचा कित्ता आता किती राज्यातले राज्यपाल गिरवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे असे मत गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले.