उत्तर प्रदेशचा यतिंदर सिंग ठरला "क्लासिक" बॉडीबिल्डर, भारत श्री सुनित जाधव उपविजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 11:41 PM2017-11-28T23:41:47+5:302017-11-28T23:41:55+5:30
अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक झालेल्या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या यतिंदर सिंगने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तळवलकर्स क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेचे जेतेपद पटकावले
- रोहित नाईक
मुंबई : अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक झालेल्या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या यतिंदर सिंगने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तळवलकर्स क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यावेळी त्याने प्रेक्षकांचा तुफान पाठींबा लाभलेल्या महाराष्ट्राच्या सुनीत जाधवचे तगडे आव्हान परतावले.
माटुंगा येथील षन्मुखानंद सभागृहात पहिल्यांदाच या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाले. देशभरातील अव्वल १० शरीरसौष्ठवपटूंमध्ये झालेल्या अंतिम फेरीत यतिंदर आणि सुनीत यांनी लक्ष वेधले. गेल्यावर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी काढण्यात अपयशी ठरलेल्या सुनीतने यंदा उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. त्याचवेळी गेल्यावर्षी जेतेपद थोडक्यात निसटल्यानंतर यंदा यतिंदरने सगळी कसर भरून काढताना बाजी मारली. यतिंदरने शानदार जेतेपदासह ६ लाख रुपयांच्या रोख बक्षिसावर कब्जा केला, तर सुनीतला ३ लाख रूपयांवर समाधान मानावे लागले.
दरम्यान देशभरातील एकूण २२० शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने दबदबा राखला. एकूण ६ खेळाडूंनी अतिंम फेरीत कडक मारताना रेल्वे, सेनादलसारख्या तगड्या शरीरसौष्ठवपटूंचे वर्चस्व मोडले.
स्पर्धेतील अव्वल १० खेळाडू :
१०. झुबेर शेख - महाराष्ट्र
९. दयानंद सिंग - सेनादल
८. रोहित शेट्टी - महाराष्ट्र
७. अक्षय मोगरकर - महाराष्ट्र
६. सर्बो सिंग - भारतीय रेल्वे
५. महेंद्र चव्हाण - महाराष्ट्र
४. सागर कातुर्डे - महाराष्ट्र
३. बॉबी सिंग - भारतीय रेल्वे
२. सुनीत जाधव - महाराष्ट्र
१. यतिंदर सिंग - उत्तर प्रदेश.