अपंगत्वावर मात करीत उत्तुंग भरारी
By admin | Published: March 8, 2016 02:03 AM2016-03-08T02:03:29+5:302016-03-08T02:03:29+5:30
लहानपणापासून यशाचे शिखर गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या २९ वर्षांच्या नेहल ठक्कर या तरुणीने अनेक संकटांवर मात करत एक उत्तम उद्योजिका होण्याचे स्वप्न पूर्ण केले
प्राची सोनवणे, नवी मुंबई
लहानपणापासून यशाचे शिखर गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या २९ वर्षांच्या नेहल ठक्कर या तरुणीने अनेक संकटांवर मात करत एक उत्तम उद्योजिका होण्याचे स्वप्न पूर्ण केले. २००५ मध्ये अपघातामुळे नेहलच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. व्हीलचेअरवर बसून सर्वसामान्यांनाही लाजवेल, अशा या कर्तृत्ववान तरुणीची ही कथा.
अपंगत्वामुळे उद्योजिका होण्याचे हे स्वप्न मात्र अपूर्ण राहता कामा नये असा निश्चय करत नेहलने २०१२ मध्ये स्वत:ची माडिया क्रिएटिव्ह हाऊस या इव्हेंट कंपनीची स्थापना केली. वर्षभर विविध उपक्रम राबविणाऱ्या या माडिया क्रिएटिव्ह ग्रुपने आतापर्यंत अनेक यशस्वी उपक्रमांचे आयोजन केले असून नवी मुंबई फूड फेस्टिव्हल, नवी मुंबई महापौर मॅरेथॉन, १२ हजारांहून अधिक लग्नसमारंभ तसेच लाइव्ह कॉन्सर्ट हे विविध कार्यक्रम माडिया क्रिएटिव्हअंतर्गत यशस्वीपणे पार पाडण्यात आले.
नेहल, स्वत:विषयी तिच्या दिनक्रमाविषयी सांगताना म्हणाली की, सकाळी एरोबिक्सने सुरु झालेला हा दिवस कामाचा व्यापात कधी संपतो हे कळतही नाही. कामात कितीही मग्न असली तरी कुटुंबासाठी नक्कीच वेळ काढते असे सांगितले. माझे काम हीच माझी पॅशन आहे असे सांगताना नेहलने कामावर प्रेम केले तर नक्कीच यश मिळते असा सल्ला दिला. मी कुठेतरी कमी आहे, माझ्यात काही कमतरता आहे असा विचार न करता सर्वसामान्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केले तर नक्कीच यशस्वी व्हाल असा मोलाचा संदेश नेहलने दिला आहे.
सध्याच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करताना ज्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रुची आहे त्या क्षेत्रातच करिअर करावे तसेच कुटुंबाने घरातील मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला तर तरुणांची स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील, असे नेहलने सांगितले. भविष्यात सर्वच स्तरातील नागरिकांना लाभ घेता येईल अशा कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचेही तिने सांगितले.