टुरिस्ट वाहन संघटनांविरुद्ध उबर उच्च न्यायालयात
By admin | Published: April 21, 2017 03:32 AM2017-04-21T03:32:59+5:302017-04-21T03:32:59+5:30
संप आणि आंदोलनाच्या सबबीखाली शहरातील वेगवेगळ्या टुरिस्ट वाहन संघटना उबरच्या भागीदारी चालकांवर हल्ले करून टॅक्सींचे नुकसान करत आहे.
दीप्ती देशमुख , मुंबई
संप आणि आंदोलनाच्या सबबीखाली शहरातील वेगवेगळ्या टुरिस्ट वाहन संघटना उबरच्या भागीदारी चालकांवर हल्ले करून टॅक्सींचे नुकसान करत आहे. मार्चपासून सतत या घटना घडत आहेत. यामध्ये उबर आणि भागीदार चालकांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे म्हणत उबर इंडिया सर्व्हिसेसने या सर्व टुरिस्ट वाहन संघटनांवर १२ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा केला आहे.
संघर्ष टुरिस्ट चालक-मालक संघ, महाराष्ट्र ओला, उबरविरुद्ध कृती समिती, मुंबई विकास फाउंडेशन, आॅल ड्रायव्हर्स वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र टुरिस्ट परमिट युनियन आणि त्यांच्या नेत्यांना या दाव्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. मुंबईभर सेवा देत असलेल्या याचिकाकर्त्यांच्या (उबर) च्या व्यवसायाचे प्रतिवादी नुकसान करत आहेत. उबरच्या भागीदारी चालकांना ते धमकी देत आहेत, असे उबरने दाव्यात म्हटले आहे.
‘त्यांचे (प्रतिवादी) हे कृत्य केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून त्यामुळे प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात आली आहे,’ असेही दाव्यात म्हटले आहे. दाव्यानुसार, या कृत्यामुळे ५७ टक्के चालकांना आॅफलाइन जावे लागले आणि त्यांना टॅक्सी बंद करण्यास भाग पाडले. चालक व प्रवासी यांना त्रास देण्याचे आतापर्यंत ८३० प्रकार घडले आहेत, असेही दाव्यात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)