‘सीएसएमटी’वरील वाहनांवर ‘यूव्हीएसएस’ची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:21 AM2017-11-25T06:21:31+5:302017-11-25T06:21:47+5:30
मुंबई : अतिरेकी हल्ल्यांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) नेहमीच अग्रस्थानी राहिलेले आहे.
महेश चेमटे
मुंबई : अतिरेकी हल्ल्यांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) नेहमीच अग्रस्थानी राहिलेले आहे. त्यामुळेच आता देशातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या सीएसएमटी येथे सुरक्षेला प्राधान्य देत अत्याधुनिक ‘अंडर व्हेईकल सर्व्हिलन्स सिस्टीम’ अर्थात ‘वाहन अंतर्गत तपासणी यंत्रणा’ नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे वाहनाच्या क्रमांकासह वाहनचालकाचा फोटो आणि वाहनाच्या खालील भागाचे छायाचित्र घेता येणे शक्य आहे. या यंत्रणेमुळे सीएसएमटी येथे येणाºया प्रत्येक वाहनासह प्रत्येक चालकाची नोंद ठेवता येणे शक्य आहे.
या यंत्रणेसाठी सुमारे २५ लाखांचा खर्च आला आहे. सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १८ वर ही यंत्रणा कार्यान्वित आहे. टर्मिनस येथे प्रवेश करताना आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर ही यंत्रणा कार्यान्वित आहे. या यंत्रणेत रस्त्यात कृत्रिमरीत्या गतिरोधक तयार करण्यात येतो. गतिरोधकाच्या खाली सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतात. कोणतेही वाहन या यंत्रणेवरून जाताच सीसीटीव्ही कॅमेरे सदर वाहनाच्या खालील बाजूचे छायाचित्र घेऊन वाहन स्कॅन करते. सीसीटीव्ही कॅमेºयांच्या बाजूला फ्लॅशलाइटचीदेखील व्यवस्था आहे. यामुळे संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ ते वाहन थांबवून चौकशी करण्यात येते. पूर्वी काठीला जोडलेल्या आरशावरून वाहन तपासणी होत असे. गर्दीच्या वेळी योग्य तपासणी करणे जिकिरीचे होते. तथापि या यंत्रणेमुळे क्लिष्ट प्रक्रिया सोपी झाली आहे.
या यंत्रणेअंतर्गत वाहन क्रमांक नोंदवता येईल आणि वाहनचालकाचा चेहरा स्पष्ट होईल, अशा उंचीवर अन्य कॅमेरे उभारण्यात आले आहेत. यामुळे सीएसएमटी स्थानक परिसरात येणाºया व जाणाºया वाहनांच्या नोंदी संगणकामार्फत केल्या जात आहेत. या यंत्रणेच्या देखरेखीसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाºयाची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथेदेखील ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. भविष्यात एकूण ६ यूव्हीएसएस मध्य रेल्वेच्या सुरक्षेसाठी कार्यरत करण्यात येणार आहेत.
>संवेदनशील टर्मिनससाठी ६ यंत्रणा
यूव्हीएसएस यंत्रणेमुळे चारचाकी वाहन, बस, ट्रक-टेम्पो, ट्रॅक्टर, ट्रेलर अशा सर्व प्रकारच्या वाहनांवर देखरेख ठेवणे सोयीस्कर ठरते. डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डरच्या (डीव्हीआर) माध्यमाने एकाच वेळी वाहन क्रमांक, वाहनचालक आणि वाहनाचा पृष्ठभाग यांचे रिअल टाइममध्ये मॉनिटरिंग करणे शक्य आहे. यंत्रणेत उच्च प्रतीच्या सीसीटीव्ही कॅमेºयांचा समावेश आहे. यूव्हीएसएस हा स्थानकातील उच्चस्तरीय सुरक्षेचा एक भाग आहे. सद्य:स्थितीत २ यूव्हीएसएस प्रभावीपणे काम करत आहेत. सुरक्षेला प्राधान्य देत लवकरच महत्त्वाच्या आणि संवेदनशील टर्मिनसवर एकूण ६ यूव्हीएसएस यंत्रणा बसवून तेथे लक्ष ठेवण्यात येईल.
- सचिन भालोदे, मुख्य सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल