लोकलमध्ये मिळणार खोळंब्याची माहिती
By admin | Published: July 3, 2015 03:31 AM2015-07-03T03:31:58+5:302015-07-03T03:31:58+5:30
गेल्या काही वर्षांत मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड होत आहेत त्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत असून, प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे.
मुंबई : गेल्या काही वर्षांत मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड होत आहेत त्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत असून, प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे. मात्र या बिघाडाची माहिती लोकलमध्ये असलेल्या प्रवाशांना मिळत नसल्याने गोंधळ वाढतो आणि त्यांची चिडचिड होते. आता मात्र या तांत्रिक बिघाडांची माहिती लोकलमध्ये उद्घोषणेद्वारे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या ही सुविधा केवळ सिमेन्स लोकलमध्ये पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक अमिताभ ओझा
यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत मेन लाइनवर ओेव्हरहेड वायर, सिग्नलमधील बिघाडाबरोबरच, लोकलमधील बिघाडाने मध्य रेल्वे वारंवार विस्कळीत होत आहे. ही सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून १० मिनिटांपासून ते एक-दोन तासांपर्यंतचा कालावधी लागतो. उद्घोषणेमुळे प्रवाशांना किमान खोळंब्याचे कारण समजण्यास मदत होईल. तीन आठवड्यांनंतर ही सेवा प्रवाशांच्या सेवेत येईल, असे ओझा म्हणाले.
तीन आठवड्यांनंतर सुरुवात
सिमेन्स लोकलमध्ये सध्या ‘पुढील स्थानक...’ अशा प्रकारची उद्घोषणा होते. आयत्यावेळी एखादी घटना घडल्यास त्याची माहिती थेट उद्घोषणेद्वारे (लाइव्ह अनाऊंसमेंट) देण्याची सोय या लोकलमध्ये होती. मात्र ती वापरात नसल्याने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची चाचणी घेण्यात येईल आणि संपूर्ण चाचणीनंतरच तीन आठवड्यांनंतर सेवा सुरू होईल, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक
अमिताभ ओझा म्हणाले.
पाच विविध प्रकारच्या गाड्यांमुळेही फटका
पाच विविध प्रकारच्या गाड्या मध्य रेल्वेवर धावत असल्याने तांत्रिक बिघाडांची संख्या जास्त असल्याची कबुली अमिताभ ओझा यांनी दिली. सध्या मध्य रेल्वेवर सिमेन्सच्या ५८, भेलच्या १0, रेट्रोफिटेड एसी-डीसी २७, डीसी गाड्या ३५ आणि रेट्रोफिटेड एसी ७ असे विविध प्रकार आहेत. यातील काही गाड्यांचे आयुर्मानही उलटून गेल्यामुळे त्यांची देखभाल करणे कठीण झाले आहे.
परळ स्थानकातील पुलाचा तिढा सुटणार
परळमधील सीएसटी दिशेकडील पुलावर गर्दी होत असल्याने आणखी एक पूल (कल्याण दिशेला) रेल्वेकडून बांधण्यात आला. मात्र या पुलाचा वापर प्रवाशांकडून होत नसल्याने हा पूल एलफिन्स्टन स्थानकावरून पश्चिमेला जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याआधी एमएमआरडीएची स्कायवॉक योजना बारगळल्यानंतर पुलाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता.
हँकॉक पुलावर हातोडा
सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पूल नोव्हेंबर महिन्यात तोडण्यात येणार असल्याचे ओझा यांनी सांगितले. हा पूल तोडून त्याची उंची वाढवण्यात येईल. हँकॉक पूल १०० वर्षे जुना असून, तो तोडण्यासाठी रेल्वेकडून विशेष ब्लॉकही घेतला जाईल.