मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका तसेच स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागा, जबाबदारी झेपत नसेल तर पद रिकामे करा, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावले. विद्यापीठाची सिनेट निवडणूक होणार असून, यासाठी नोंदणीचा वेग वाढविण्याचीही सूचना मुंबईतील विभाग अध्यक्षांना त्यांनी केली.
वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पार पडलेल्या या बैठकीला मनसेचे सर्व नेते, सरचिटणीस, यांच्यासह मुंबईतील विभाग अध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात करा, असे सांगितले. या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या काळात मुंबईत आणि कोकणात मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत, त्याची माहितीही पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. बैठकांना वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही यावेळी तंबी देण्यात आली असून, यापुढे असा प्रकार सहन केला जाणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गाबाबत गडकरींशी चर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून मुंबई-गोवा महामार्गाबाबत चर्चा झाली. त्यानंतर नितीन गडकरींशी फोनवरून चर्चा झाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गासारखा मोठा महामार्ग कमी कालावधीत होऊ शकतो, तर मग १५-१६ वर्षे होऊनही कोकणचा रस्ता का होत नाही, असा सवाल त्यांना केला. गडकरींनी दोन काॅन्ट्रॅक्टर पळून गेल्याची माहिती दिली. आता यात स्वत: लक्ष घालून आठवडाभरात त्या रस्त्याचे काम कधी सुरू होईल, याची माहिती देणार असल्याचे गडकरींनी सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले.