- सुहास शेलार
मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पर्यटन क्षेत्राने पुन्हा एकदा नव्याने भरारी घेतली आहे. दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर देशांतर्गत पर्यटनास मोठा प्रतिसाद मिळत असून, सुट्याच्या पार्श्वभूमीवर बुकिंगही वाढले आहे. त्यामुळे दिवाळी पर्यटन क्षेत्राला उभारी देणारी ठरो, अशी आशा व्यावसायिक करू लागले आहेत.
कोरोनाकाळात पर्यटनाचा ट्रेंड बदलला आहे. देशांतर्गत पर्यटनाला पसंती मिळत असून, बहुतांश नागरिक घरापासून जवळ म्हणजे ३०० ते ३५० किलोमीटरच्या आत भ्रमंती करण्यास उत्सुक आहेत. गोवा, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरला भेट देणाऱ्यांचीही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे व्यावसायाला सावरण्यासाठी देशांतर्गत सहलींच्या आयोजनावर भर दिला जात असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक रुद्रेश पंडित यांनी दिली.
चैनीपेक्षा सुरक्षेला प्राधान्य- पर्यटक आता चैनीपेक्षा सुरक्षेला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. - स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंग आणि तंत्रज्ञानाधारित सुरक्षा साधनांसह प्रवास करण्यास बरेच जण प्राधान्य देत आहेत. - पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांत २५ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक असल्याचे पर्यटन अभ्यासक आशिष ध्रुव यांनी सांगितले.
पॅकेजमध्ये वाढ- गेल्या काही महिन्यांपासून विमान तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शिवाय हॉटेल्सचे भाडेही पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्यामुळे सहलींच्या पॅकेजमध्ये वाढ करावी लागल्याची माहिती दामले यांनी दिली आहे.
या ठिकाणांना सर्वाधिक पसंतीदेशांतर्गत : गोवा, जयपूर, मनाली, आग्रा, म्हैसूर, शिमला, उटी, पाँडिचेरी, काश्मीर.आंतरराष्ट्रीय : संयुक्त अरब अमिराती, मॉरिशस, इजिप्त, दक्षिण आफ्रिका
सध्या देशांतर्गत पर्यटनासाठी बरीच विचारणा होत आहे. तीन-चार दिवसांच्या पॅकेजसह दीर्घ सहलींनाही मागणी आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला म्हणावा तितका प्रतिसाद नाही. वेगवेगळ्या निर्बंधाचा हा परिणाम आहे. कित्येक देशांची व्हिसा प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अडचणी जाणवत आहेत. - रवींद्र पाटील, सहल आयोजक
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सहलींबाबत मोठ्या प्रमाणात विचारणा होत असली, तरी अद्याप बुकिंग फारसे झालेले नाही. नोव्हेंबरपासून पुढे पोषक वातावरण निर्माण होईल, अशी आशा आहे. फक्त निर्बंधात कोणतीही वाढ व्हायला नको. कारण काही तरी वेडीवाकडी बातमी कानावर पडली की पर्यटक चिंतित होऊन बेत रद्द करतात. - अनिल दामले, पर्यटन व्यावसायिक