धारावीत तीन दिवसात १० हजार ५०० जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:07 AM2021-07-14T04:07:54+5:302021-07-14T04:07:54+5:30
मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून, धारावीत तर लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. येथे ...
मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून, धारावीत तर लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. येथे शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवसात १० हजार ५०० जणांना लस देण्यात आली असून, लसीकरण मोहिमेचा वेग आणखी वाढविण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. सरकार, मनपा, लोकप्रतिनिधी, संस्था आणि जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांनी धारावीने यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग पकडला आहे. धारावीत लसीकरण मोहिमेचा धडका सुरू असून, लोकप्रतिनिधींसह महापालिका आणि सेवाभावी संस्था येथे कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी कार्यरत आहेत.
धारावीकरांसाठी याच अंतर्गत मेगा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता धारावी मेन रोड येथील जीवन हॉलमध्ये लसीकरण मोहीम राबविली गेली. ११ जुलै रोजी सकाळी १०. वाजता धारावीमधील कुंभारवाडा येथील प्रजापती हॉलमध्ये लसीकरण मोहीम राबविली गेली. १२ जुलै रोजीदेखील लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, धारावीत उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णाची शून्य रुग्णसंख्या नोंदविण्यात येत आहे.