मुंबई : मुंबईत १४ फेब्रुवारीपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यासाठी मुंबईत आतापर्यंत १ लाख २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे, मात्र त्यापैकी आतापर्यंत ३६ हजार ३९० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाला सुरुवात होताना कोविन ॲपमध्ये अनेक अडचणी आल्या. यामुळे दोन दिवस लसीकरण बंद होते. १९ जानेवारीपासून लसीकरणाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. १६ जानेवारीपासून आतापर्यंत दहा सत्रात म्हणजेच दहा दिवसांच्या लसीकरणादरम्यान केवळ ३६,३९० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या 'कोव्हिशिल्ड' या लसीच्या १ लाख ३९ हजार ५०० डोसचा साठा १३ जानेवारीला मुंबईत दाखल झाला. तर गुरुवारी २१ जानेवारीला पहाटे दुसऱ्या टप्प्यात १ लाख २५ हजार डोस पालिकेला उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत पालिकेला २ लाख ६४ हजार ५०० लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. परळ येथील पालिकेच्या एफ दक्षिण विभागात लस साठवणूक केंद्रात ही लस ठेवण्यात आली आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेता यावी म्हणून वॉक इन वॅक्सिनेशन कार्यक्रम राबवला जात आहे. यामुळे ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला तो कामावर असलेल्या विभागातील जवळच्या कोणत्याही केंद्रावर लस घेता येत आहे, परिणामी याचा सकारात्मक परिणाम दिसत असून येत्या काही दिवसांत आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण निश्चित वाढताना दिसेल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
36 हजार कर्मचाऱ्यांना लस, मुंबईतील आकडेवारी; आतापर्यंत १ लाख २५ हजार कर्मचाऱ्यांनी केली नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 7:16 AM