केबल, इंटरनेट पुरवठादारांचे सरसकट लसीकरण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:07 AM2021-04-11T04:07:06+5:302021-04-11T04:07:06+5:30
मुंबई : केबल आणि इंटरनेट पुरवठादार हे सातत्याने ग्राहकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याने त्यांचे ...
मुंबई : केबल आणि इंटरनेट पुरवठादार हे सातत्याने ग्राहकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याने त्यांचे सरसकट लसीकरण करावे, अशी मागणी शिव केबल सेनेने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.
मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून नागरिक घरात राहण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिल्याने इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही सुविधा अखंड सुरू ठेवण्यासाठी केबल आणि इंटरनेट पुरवठादारांना सातत्याने ग्राहकांच्या संपर्कात यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय एखाद्या पुरवठादाराला कोरोनाची बाधा झाल्यास तो सुपर स्प्रेडरही ठरू शकतो. आतापर्यंत शेकडो केबल ऑपरेटर्स आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. त्याची नोंद शासनाने घेतली नाही, अशी खंत शिव केबल सेनेने मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.
केबल आणि इंटरनेट पुरवठादारांचा अत्यावश्यक सेवेत सामावेश करण्यात आला. परंतु, इतर अत्यावश्यक सेवेकऱ्यांप्रमाणे त्यांना सुविधा देण्यात आल्या नाहीत. लसीकरणातही त्यांच्यासोबत दुजाभाव करण्यात आला. हा अन्याय दूर करून इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे केबल आणि इंटरनेट पुरवठादारांचेही सरसकट लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्य सचिवांकडे केल्याचे शिव केबल सेनेचे सरचिटणीस विनय पाटील यांनी सांगितले.