लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून रोजच्या लसीकरणाची क्षमता आता पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे.
राज्यात मंगळवारी ५ लाख ७७ हजार ११४ जणांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत ४ कोटी २३ लाख ५२ हजार ५८० जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ७७ लाख ३२ हजार ८९८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ७ लाख ८० हजार ९५ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ८५ लाख ५ हजार ६७० जणांनी पहिला डोस, तर ५ लाख १४ हजार ४९५ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात २१ लाख १५ हजार ९२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ११ लाख ३८ हजार ४०२ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १२ लाख ८६ हजार ८१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ९ लाख ४ हजार ८४७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.