मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या १२४२ लाभार्थ्यांचे आतापर्यंत लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 10:14 PM2021-08-07T22:14:30+5:302021-08-07T22:14:57+5:30
अंथरुणाला खिळलेले व वयोवृद्ध नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लस देण्याच्या मोहिमेला २ ऑगस्ट पासून संपूर्ण मुंबईत सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ७१५ नागरिकांनी या मोहिमेअंतर्गत नोंदणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - अंथरुणाला खिळलेले व वयोवृद्ध नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लस देण्याच्या मोहिमेला २ ऑगस्ट पासून संपूर्ण मुंबईत सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ७१५ नागरिकांनी या मोहिमेअंतर्गत नोंदणी केली आहे. तर पाच दिवसांत म्हणजे शनिवारपर्यंत १२४२ लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात आली आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार १८ वर्षांवरील सुमारे ९५ लाख लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ५६ लाख ४५ हजार ९४५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर १८ लाख ६९ हजार ५१२ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र अंथरुणाला खिळलेले व वयोवृद्ध नागरिक लसीकरणासाठी केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना घरी जाऊन लस देण्याची सुविधा महापालिकेने सुरू केली आहे.
ही मोहीम प्रायोगिक तत्त्वावर के पूर्व विभाग म्हणजेच जोगेश्वरी व अंधेरी पूर्व येथे गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आली. त्यानंतर आता संपूर्ण मुंबई ४७१५ लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. मात्र पुढील सहा महिने अंथरुणावरच असणार असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्या डॉक्टरकडून दिले जात नसल्याचे समोर आले होते. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेमार्फत प्रयत्न केले जात आहेत.
२१ लाभार्थ्यांना दोन्ही लस
अंथरुणाला खिळलेले व वयोवृद्ध व्यक्तींना घरीच लस मिळावी, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. याकरिता अशा व्यक्तींचे नाव कळविण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. त्यानुसार चार हजार ७१५ नागरिकांची नोंद झाली आहे. यापैकी आतापर्यंत १२४२ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर यापैकी २१ नागरिकांना दोन्ही लस मिळाली आहे.