राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
राज्यातील १३,००० कैद्यांचे लसीकरण
राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आतापर्यंत राज्यातील सर्व कारागृहातील १३,००० कैद्यांचे लसीकरण करण्यात आले आहे आणि कारगृहांतील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील तुरुंगात ज्या उपाययोजना करण्यात आल्या, त्यामुळे कारागृहातील स्थितीमध्ये मोठी सुधारणा झाली आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.
राज्यातील ४७ कारगृहात २३,३७२ कैदी आहेत. त्यापैकी १३,५६७ कैद्यांचे लसीकरण झाले आहे. तसेच कारागृहातील ३,६४१ कर्मचाऱ्यांचेही लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय कारागृह प्रशासनाने उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींवर अंमलबजावणी करत २,७०० कैद्यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळे कारागृहातील गर्दी कमी झाली आहे. लसीकरण प्रक्रियेनेही वेग धरला आहे, अशी माहिती सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.
कारागृहात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याने उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने (सुओ-मोटो) याचिका दाखल करून घेतली. त्यावरील सुनावणीत कुंभकोणी यांनी वरील माहिती न्यायालयाला दिली. न्यायालयाने पुढील सुनावणी २२ जुलै रोजी ठेवली आहे.
..........................................................