बोरिवली परिसरात १८०० नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:06 AM2021-09-03T04:06:36+5:302021-09-03T04:06:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व फाऊंडेशन आणि जसलोक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व फाऊंडेशन आणि जसलोक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नाना पालकर स्मृती समितीच्या बोरिवली येथील रुग्णसेवा केंद्रात लसीकरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे दोन दिवसात
बोरिवली, चारकोप, गोराई येथील सुमारे १८०० नागरिकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.
अथर्व फाऊंडेशनतर्फे यापूर्वी गोराई गाव आणि मनोरी येथील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी मनोरी येथे तीनवेळा विशेष लसीकरण मोहीम राबवून १७०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. बोरिवलीतही शेकडो नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
आमदार सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व फाऊंडेशनने मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम नियमित राबविले जातात. शहीद जवानांच्या परिवारांना मदत, ग्रामीण भागातील मुलींसाठी शिक्षण, महिला सबलीकरण, शाळकरी मुलांना सायकल, वह्यांचे वाटप, कोविड योद्धांचा सत्कार, विविध पोलीस ठाण्यांना संगणक भेट, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे असे उपक्रम अथर्व फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येतात.