Join us

एकाच दिवशी 20 लाख लोकांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 6:20 AM

देशात लाभार्थी २.३ कोटी : संयुक्त राष्ट्रांकडून भारताची प्रशंसा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ८ मार्च रोजी २० लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली गेली असून, एका दिवशीची ही सगळ्यात मोठी संख्या आहे. या संख्येमुळे देशात आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या २.३ कोटी झाली आहे, ही माहिती मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने येथे दिली. कोविड-१९ लसीकरणाचा मंगळवार हा ५२वा दिवस होता. त्या दिवशी २० लाख १९ हजार ७२३ जणांना लस दिली गेली. या संख्येपैकी १७ लाख १५ हजार ३८० जणांना २८ हजार ८८४ सत्रांत लसीची पहिली मात्रा दिली गेली. तीन लाख चार हजार ३४३ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लसीची दुसरी मात्रा दिली गेली. 

१७ लाख १५ हजार ३८० लाभीर्थींत १२ लाख २२ हजार ३५१ हे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे, तर २ लाख २१ हजार १४८ लाभार्थी ४५ ते ६० वयोगटातील वेगवेगळ्या आरोग्य तक्रारी असलेले होते.१६ जानेवारी रोजी देशभर कोरोना लसीकरण सुरू झाले. त्यात त्याने लक्षणीय यश प्राप्त केले आहे. लसीच्या दोन दशलक्षपेक्षाही जास्त मात्रा २४ तासांत दिल्या गेल्या, असे मंत्रालयाने म्हटले.कोविड - १९च्या महामारी संकटात भारत त्याला असलेला व्यापक अनुभव व औषधांतील सखोल माहितीमुळे जगाचे औषधालय समजला गेला. भारत हा औषध बनवणारा जगातील एक मोठा देश असून, त्याच्याकडून कोरोनावरील लस घेण्यासाठी आधीच अनेक देशांनी संपर्क साधला आहे, असे युएन वुमेनच्या सहायक सरचिटणीस आणि उपकार्यकारी संचालक अनिता भाटिया म्हणाल्या.

भारताची युनोकडून प्रशंसान्यूयॉर्क : कोरोना लसीकरणात भारताने घेतलेल्या पुढाकाराची संयुक्त राष्ट्रांच्या महिला अधिकाऱ्याने प्रशंसा करून भारत लस समानरीत्या उपलब्ध होण्यास मदत करीत आहे, तर श्रीमंत देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त लसी खरेदी करून खासगी लाभ मिळवत आहेत, असे भाष्य केले.

देशात एका दिवसात कोरोनाचे आणखी १५,३८८ नवे रुग्ण समोर आले आहेत तर, ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या आता १,१२,४४,७८६ वर पोहोचली आहे. त्यातील १,०८,९९,३९४  लोक संसर्गमुक्त झाले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील मृतांची संख्या १,५७,९३० झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १,८७,४६२ वर पोहोचली आहे. 

एकूण रुग्णांशी हे प्रमाण १.६७ टक्के आहे. देशातील मृत्यूदरही कमी होऊन १.४० टक्के झाला आहे. बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के आहे. 

 

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या