मुंबई : मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने शहर व उपनगरे येथे अंथरुणाला खिळून असलेल्या व नोंदणी झालेल्या ४,५२५ जणांपैकी आतापर्यंत २,५२५ जणांना लसीचा पहिला डोस दिला आहे. उर्वरित नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. पालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत हाती घेतलेल्या या मोहिमेची दखल घेऊन उच्च न्यायालयानेही कौतुक केले आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
राज्य सरकारने निर्माण केलेल्या टास्क फोर्सच्या सूचनेनुसार महापालिकेतर्फे १२ ते १८ वयोगटातील २० लाख मुलांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पालिकेकडे ३० हजार बेड उपलब्ध असून त्यापैकी फक्त ६०० बेडवर रुग्ण आहेत.
मुंबई महापालिकेला दररोज लसीचा आवश्यक साठा वेळेत उपलब्ध झाल्यास लसीकरण प्रक्रियेला वेग येईल. पालिकेने दररोज २ लाख डोस देण्याचे नियोजन केले आहे. मुंबईत पालिका, सरकार आणि खासगी मिळून ४३८ केंद्रांवर १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ६३ लाख ४० हजार जणांना पहिला, तर २१ लाख ६० हजार जणांनी घेतला दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये एकूण ८५ लाख डोस देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली आहे.