मुंबई - रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण व जनजागृती पंधरवडा नुकताच पाळण्यात आला. या कालावधीत महापालिकेमार्फत तीन हजार ४९३ भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, पाळीव श्वानांही वर्षातून एकदा व निर्धारित दिवशी रेबीज प्रतिबंधात्मक लस पशुवैद्यकांकडून द्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे महाव्यवस्थापक डॉ.के.ए.पठाण यांनी केले आहे.
दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जगभरात ‘रेबीज दिवस’ पाळला जातो. मुंबई महापालिकेद्वारे २८ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण व जनजागृती पंधरवडा पाळण्यात आला. या अंतर्गत दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी पालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे दोन चमू कार्यरत होते.
यामध्ये पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि श्वान पकडण्याकरिता अर्ध पशुवैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश होता. तसेच प्राणीप्रेमी संस्था, द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, मुंबई ऍनिमल्स असोसिएशन व पेट ओनर्स व ऍनिमल लव्हर फाऊंडेशन या संस्थांचाही समावेश होता. तसेच श्वान पकडण्यासाठी पालिकेच्या परिवहन खात्याद्वारे वाहने उपलब्ध करुन देण्यात आली होती.
यासाठी साजरा होतो रेबीज दिवस-
रेबीज या रोगाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर रेबीज या रोगाचा प्रतिबंध करणे आणि रेबीजचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या विविध स्तरीय उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. प्रसिद्ध फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. लुईस पाश्चर व त्यांच्या चमूने सर्वप्रथम रेबीजची पहिली प्रभावी लस विकसित केली होती.