Join us

कांदिवली बनावट लस प्रकरणातील ३९० जणांचे आज लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृहसंकुलात खासगी केंद्रामार्फत झालेले लसीकरण बोगस असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृहसंकुलात खासगी केंद्रामार्फत झालेले लसीकरण बोगस असल्याचे उजेडात आले होते. या प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांना अखेर लस देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी कांदिवलीतील लसीकरण केंद्रांवर ३९० जणांना लस मिळणार आहे.

कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने खासगी केंद्रामार्फत ३० मे रोजी लसीकरण आयोजित केले होते. मात्र, हे लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब काही दिवसांनी उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चौकशीदेखील सुरू केली. या चौकशीत असे एकूण नऊ बनावट व अनधिकृत लसीकरणाचे प्रकार घडल्याचे समोर आले.

लसीकरणाच्या अशा बोगस प्रकरणांमध्ये शेकडो नागरिकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. या नागरिकांना लसीऐवजी ग्लुकोजचे पाणी देण्यात आले. या लाभार्थ्यांना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तर, काहींची कोविन पोर्टलवर नोंद केल्याचेदेखील निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकाराची पोलिसांमार्फत सखोल चौकशी सुरू आहे.

येथे मिळणार लस

कांदिवली (पश्चिम)मध्ये महावीरनगर परिसरातील ऍमिनिटी मार्केट महानगरपालिका लसीकरण केंद्रावर सत्र आयोजित करण्यात आले आहे. येथे शनिवारी सकाळी ३९० लाभार्थ्यांना लस मिळणार आहे. मुंबईत आढळलेल्या नऊ बनावट लस प्रकरणांतील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलिसांकडून महापालिकेला मिळाली आहे. या नागरिकांना अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक ती सर्व पडताळणी करून कार्यवाही सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

अशी मिळणार लस

पोलीस तपासानुसार ज्या नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याचा संशय आहे, त्या नागरिकांची यादी पालिकेला मिळाली आहे. त्यानुसार कोविन संकेतस्थळावर भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे या नागरिकांची माहिती पडताळण्यात येत आहे. खरी लस मिळालेल्या नागरिकांना नियमानुसार कालावधी पूर्ण होताच दुसरा डोस देण्यात येईल. तर, ज्यांना बनावट लस देण्यात आली, त्यांना योग्य कार्यवाही करून अधिकृत लस देण्यात येणार आहे.