लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वीज सेवा देणाऱ्या महावितरणच्या ७५ हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ३५ हजार ६०० म्हणजे ४७ टक्के नियमित व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये महावितरणचे ६ हजार ५६२ कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी ४ हजार १३२ कोरोनामुक्त झाले आहे. सध्या २ हजार २२१ कर्मचारी कोरोनाबाधित असून त्यांच्यावर रुग्णालय व घरी उपचार सुरू असून, लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मुख्यालयासह सर्व परिमंडळ कार्यालयांमध्ये समन्वय कक्ष कार्यान्वित झाले आहेत. या कक्षांद्वारे कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना, कुटुंबीयांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या, कुटुंबातील सदस्यांना महावितरणच्या विविध वसाहतींमधील निवासस्थाने तसेच प्रशिक्षण केंद्रांमध्ये विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार विलगीकरणाच्या कालावधीत त्यांच्यासाठी किंवा कुटुंबीयांसाठी आवश्यक ते सहकार्य केले जात आहे. तसेच कोरोना व लसीकरणाबाबत परिमंडळ स्तरावर दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत.
..........................................