मुंबई- कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस मुंबईतील सर्व नागरिकांनी घेतला आहे. तर ७८ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच ५४ टक्के गृहनिर्माण सोसायट्यांमधील शंभर टक्के रहिवाशांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे दुसरा डोस शिल्लक असलेल्या नागरिकांचा शोध घेऊन दिलेल्या मुदतीत त्यांना लस उपलब्ध करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत पालिका, सरकारी आणि खासगी मिळून ४५१ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. त्यानुसार १० डिसेंबरपर्यंत एक कोटी ६९ लाख ६९ हजार ३१४ डोस देण्यात आले आहेत. लसीकरण पूर्ण करणाऱ्या सोसायट्यांना प्रोत्साहन देण्याकरिता दर्शनी भागात 'माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी' असा बोर्ड लावण्याचा उपक्रम महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत २० हजार सोसायट्यांनी लसीकरण पूर्ण केले आहे.
असे मिळते सोसायट्यांना प्रोत्साहन....
लसीकरण पूर्ण करणाऱ्या सोसायट्यांच्या दर्शनी भागात माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी' असा संदेश असलेल्या भित्तीपत्रकावर संबंधित सहकारी संस्थेचे नाव, विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची स्वाक्षरी व पालिकेचा स्टॅम्प असतो. तसेच आकर्षक आणि अभिमानास्पद ढाल असणारी भित्तीपत्रके लावण्यात येत आहेत. याच 'पोस्टर'वर एक 'क्यू आर कोड' असून तो आपल्या मोबाईलच्या सहाय्याने स्कॅन केल्यावर मोबाईलवर https://stopcoronavirus.mcgm.gov.in/vaccination हे संकेतस्थळ उघडले जाते.
१८ वर्षांवरील एकूण लाभार्थी - ९२ लाख ३६ हजार ५००
आतापर्यंत पहिला डोस घेणारे - ९७ लाख २७ हजार ६५५ (मुंबईबाहेरील नागरिकांचा समावेश )
दुसरा डोस पूर्ण झालेले - ७२ लाख ४१ हजार ६५९
मुंबईत ३७ हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. यापैकी २२ हजार सोसायट्या नोंदणीकृत आहेत.