मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमाने प्रत्येक नागरिकाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आज वांद्रे, विलेपार्ले आणि सांताक्रुझ येथे नऊ हजार नागरिकांच्या लसीकरणासाठी मोफत लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज या शिबिरांना भेट देऊन पाहणी केली. लसीकरण शिबिरांचे आयोजन करताना कोविड विषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. (Vaccination of 9,000 citizens from vaccination camps at Bandra, Vile Parle, Santacruz)
सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी मंत्री आदित्य ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एच एन रिलासन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर, विलेपार्ले येथील पार्ले इंटरनॅशनल हॉल आणि सांताक्रुझ येथील साने गुरूजी शाळेत आज प्रत्येकी तीन हजार लसींचे डोस देण्यात येत आहेत.
यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, युवासेना सरचिटणीस वरूण सरदेसाई, माजी महापौर व नगरसेवक प्रि. विश्वनाथ महाडेश्वर, सुधार समिती अध्यक्ष सदा परब, प्रभाग समिती अध्यक्ष शेखर वायंगणकर, नगरसेविका रोहिणी कांबळे, नगरसेवक संदीप नाईक, माजी नगरसेवक सुभाष सावंत, नितीन डिचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.