Corona Vaccination: मुंबईत मर्यादित साठ्यामुळे लसीकरण पुन्हा अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 04:36 AM2021-04-22T04:36:42+5:302021-04-22T04:37:01+5:30
Corona Vaccine खासगी केंद्रातील लसीकरण ठप्प हाेण्याच्या मार्गावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. मात्र लसींचा साठा मर्यादित असताना केंद्र सरकारकडून साठा लवकर उपलब्ध होत नाही. त्यामुळे सध्या केवळ पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रावर नागरिकांना डोस दिले जात आहेत. तर मुंबईतील खासगी केंद्रांवरील लसीकरण ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यावर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात येत असून काही ठिकाणी दोन पाळ्यांमध्ये लस दिली जात आहे. मात्र दर आठवड्याला किमान दहा लाख डोस येणे गरजेचे असताना मुंबईला जेमतेम एक ते दोन लाख डोस मिळत आहेत.
३९ खासगी केंद्रांमध्ये लसीकरण बंद
nसद्य:स्थितीत पालिकेची ३९, सरकारी १७ आणि खासगी ७३ केंद्रांवर लसीकरण केले जाते. लसींचा साठा न पोहोचल्यामुळे २०, २१ एप्रिल रोजी ३९ खासगी केंद्रांमध्ये लसीकरण बंद हाेते.
nडोस कमी असल्याने खासगी केंद्रांना डोस देणे शक्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासगी केंद्रांमधील लसीकरण बंद होण्याची शक्यता पालिकेतील अधिकाऱ्याने व्यक्त केली. पालिकेकडे केवळ एक-दोन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा उपलब्ध आहे.