मुंबई : आजारपणासह शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांना दि. ३० जुलैपासून त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रयोग जोगेश्वरी, अंधेरी पूर्व या विभागात केला जाणार आहे. यासाठी आतापर्यंत चार हजार ४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे नाव नोंदवले आहे. बिगर शासकीय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे लसीकरण केले जाणार आहे.
मुंबईत दि. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६९ लाख ६६ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खासगी केंद्रांमार्फत लसीकरण, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र आजारपण, शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींना त्यांच्या घरीच जाऊन कोविड लस देण्यासंदर्भात मागणी केली जात होती.
राज्य शासनाने संपूर्ण राज्यात स्थानिक प्राधिकरणांना या संदर्भात नागरिकांकडून माहिती संकलित करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण अशी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ई-मेल आयडीवर मागविण्यात आली होती. आतापर्यंत अशा ४,४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे संपर्क साधला आहे.
यांना मिळणार लस
संबंधित व्यक्ती पुढील किमान सहा महिने अंथरुणाला खिळून राहणार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तीचे संमतीपत्र संबंधित व्यक्ती, नातेवाईक यांना प्रशासनाला सादर करावे लागेल.
तज्ज्ञांच्या समितीने दिले निर्देश
अशा व्यक्तींना कोव्हॅक्सिन लस देण्याचे निर्देश तज्ज्ञांच्या समितीने दिले आहेत. त्यानुसार कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत लसीकरण करुन त्याबाबत आवश्यक सर्व प्रक्रिया पाळण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण सुरु झाल्यानंतर, कोणकोणत्या बाबी अशा कार्यवाहीमध्ये समाविष्ट कराव्या लागतील, याचा विचार करुन पुढील टप्पा हाती घेण्यात येणार आहे.