मुंबईत लसीकरणाला सुरुवात; कुठे उत्साह, तर कुठे भीती, सर्वत्र नियमांचे काटेकोरपणे पालन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 08:58 AM2021-01-17T08:58:10+5:302021-01-17T09:02:25+5:30

मुंबई - कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी लसीचे प्रत्यक्ष काम शनिवारी सुरू झाले. मुंबईकरांना वाचवणारी ही ठरल्याप्रमाणे प्रथम कोविड ...

Vaccination begins in Mumbai; Where there is excitement, where there is fear, strict adherence to the rules everywhere | मुंबईत लसीकरणाला सुरुवात; कुठे उत्साह, तर कुठे भीती, सर्वत्र नियमांचे काटेकोरपणे पालन

मुंबईत लसीकरणाला सुरुवात; कुठे उत्साह, तर कुठे भीती, सर्वत्र नियमांचे काटेकोरपणे पालन

Next

मुंबई - कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी लसीचे प्रत्यक्ष काम शनिवारी सुरू झाले. मुंबईकरांना वाचवणारी ही ठरल्याप्रमाणे प्रथम कोविड योद्धांना देण्यात आली. सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत ही लस देण्यात आली. नागरिकांच्या मनात या लसीबाबत साशंकाही आहे आणि सामधानदेखील. त्यामुळे लस घेणार्या योद्धांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यांचे अनुभव कुतुहलाने ऐकले जात होते. दिवसभर केवळ या लसीची आणि त्यामुळे होणार्या परिणामांची चर्चा सुरू होती. 

केईएम रुग्णालयात सकारात्मक प्रतिसाद -

कोरोनाच्या तीव्र संक्रमणकाळात रुग्णालयातील भयाण शांतता, चिंतेत असलेले चेहरे आणि रुग्णाच्या काळजीने अहोरात्र ताटकळत बसलेले कुटुंब या स्थितीनंतर शनिवारी परळ येथील केईएम रुग्णालयाच्या आवारातील वातावरणात अत्यंत सकारात्मकता दिसून आले. केईएम रुग्णालयात शनिवारी सकाळी लसीकरण केंद्राबाहेर रांगोळी काढण्यात आली होती. धाकधूक, भीती अन् आनंद असे संमिश्र वातावरण हाेते.

केईएम रुग्णालयात शनिवारी सकाळी रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर यांना सर्वांत आधी लसीकरणाचा मान मिळाला. त्यानंतर आरोग्य कर्मचारी विमल खरात आणि डॉ. शेखर जाधव यांनी लसीचा डोस घेतला. लसीकरण केंद्रात मुख्य कक्षात नोंदणी पडताळल्यानंतर स्वाक्षरी करून लस देण्यात येत आहे. लसीकरण केंद्रात फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले; शिवाय अत्यंत उत्तम व्यवस्थापन करण्यात आले होते. डोस घेतल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आप्तेष्ट-कुटुंबीयांना फोन, मेसेज करून आनंद व्यक्त केल्याचे चित्र होते.

या केंद्रात लसीकरण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या वरिष्ठ परिचारिका चारूशीला मोरे यांनी सांगितले. तीव्र संसर्गाच्या काळात कोरोना कक्षात काम केल्यानंतर शनिवारी लसीकरण केंद्रात काम करण्याचा हाेणारा आनंद वेगळा आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळाल्यामुळे वेगळी भावना आहे. 
मीही नोंदणी केली आहे. मात्र माझा नंबर येण्यास काही दिवस जावे लागतील. या कक्षात समन्वय पाहण्याची जबाबदारी आहे. लसीकरणानंतर अर्ध्या तासासाठी लसदिलेल्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

अत्यानंद आणि अभिमान
पहिल्याच दिवशी डोस मिळाल्याने आनंद आहे. शिवाय ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळात सर्व कोविड योद्ध्यांनी संघर्ष केला आणि त्यांनाच लसीकऱणाचा मान मिळाला याचाही अभिमान आहे. - डॉ. मीनल शहा, केईएम रुग्णालय

निर्धास्तपणे लस घ्या !
लसीच्या डोसनंतर अगदी क्वचित प्रमाणात एखाद्याला अंगदुखी वगैरे वाटू शकते. घाबरण्यासारखे काही नाही. ही अत्यंत सामान्य स्थिती आहे. यंत्रणेवर विश्वास ठेवा. लसीचा डोस निश्चित घ्या; साेबतच कोरोनाविषयक मार्गदर्शक नियमही पाळा. 
- डॉ. मिलिंद नाडकर, उपअधिष्ठाता, केईएम रुग्णालय

भीती पळून गेली
लसीचा डोस घेतल्यानंतर ही भीती पळून गेली. कोरोनाच्या १० महिन्यांच्या काळात अहोरात्र केलेली मेहनत आता क्षणभरात डोळ्यांसमोरून गेली. लस घेतल्याने बरे वाटत आहे. - प्रवीण मकवाना, आरोग्य कर्मचारी

जे.जे. मध्ये मार्गदर्शक सूचनांचे पालन -

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानुसार, नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खासगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या लसीचे २ डोस ४ आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.
याप्रसंगी आमदार अमिन पटेल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता रणजीत मानकेश्वर, डाॅ.तात्याराव लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

कूपर रुग्णालयात ५०० जणांना मिळाली लस -

- पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पश्चिम येथील डॉ. आर. एन. कूपर हॉस्पिटलमध्ये ऐतिहासिक लसीकरण मोहिमेला सकाळी ११.४५ वाजता दिमाखात सुरुवात झाली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत लसीकरण केंद्र शनिवारपासून सुरू झाले. लसीकरणाच्या 
आधी या केंद्राबाहेर नोंदणी करून त्यांना टोकन देण्यात येत होते. लसीकरण केंद्राच्या आत खास एक ते चार आणि पाच ते आठ असे लसीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. लस टोचल्यानंतर त्यांना सुमारे अर्धा तास निरीक्षण केंद्रात ठेवण्यात येत होते, लस घेतल्यानंतर काही त्रास झाला तर खास निरीक्षणालय कक्षाची सुविधाही येथे उपलब्ध करण्यात आली. 

- मात्र शनिवारी या केंद्रात लस घेतल्यानंतर कोणालाही त्रास झाला नाही आणि पहिल्याच दिवशी येथील लसीकरण मोहीम यशस्वी झाली, असे येथील अधिष्ठाता डॉ. पिनाकीन गुज्जर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू होती, असे त्यांनी सांगितले. एका व्यक्तीला इंजेक्शनची सुई टोचल्याप्रमाणे काही सेकंदांत हातावर येथे लस दिली जात होती. मात्र एका व्यक्तीला साधारण पाच मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे येथील चित्र होते.

- माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि त्यांची पत्नी डॉ. अनिला सावंत यांना प्रथम लसीकरणाचा मान मिळाला. तत्पूर्वी येथील लसीकरण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद‌्घाटनपर भाषणाचा स्क्रीनद्वारे उपस्थित मान्यवरांनी लाभ घेतला.गेली १० महिने कोरोनाशी लढा देणाऱ्या ५०० कोविड योद‌्द्यांना प्रथम लस देण्यात आली. 

- यामध्ये डॉक्टर, नर्स, कर्मचारी, सफाई कामगार अशा प्रकारच्या कूपर हॉस्पिटलसह इतर ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस देण्यात आली. एका वेळी चारजणांना लस घेता येईल, असे खास दोन कक्ष तयार करण्यात आले होते. लस घेतल्यानंतर त्यांना काही वेळ देखरेख कक्षात ठेवण्यात आले. त्यांना लस घेतल्याचा आनंद झाला होता; तर कोणालाही लस घेतल्यानंतर काही त्रास झाला नाही.

Web Title: Vaccination begins in Mumbai; Where there is excitement, where there is fear, strict adherence to the rules everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.