पूर्वसूचना मिळताच 24 तासांत लसीकरण सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 06:22 AM2021-01-03T06:22:00+5:302021-01-03T06:22:11+5:30

पालिका : कोविड १९ लसीकरण केंद्रांचा घेतला आढावा

Vaccination begins within 24 hours of approval | पूर्वसूचना मिळताच 24 तासांत लसीकरण सुरू 

पूर्वसूचना मिळताच 24 तासांत लसीकरण सुरू 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेले वर्षभर कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करणाऱ्या मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी मिळाल्यामुळे मुंबई महापालिकेनेही लसीकरणाच्या पूर्वतयारीचा आढावा शनिवारी घेतला. कोरोनावरील लस प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या पूर्वसूचनेने प्रत्यक्ष लसीकरण सुरू करता येईल, अशी तयारी महापालिकेने ठेवली आहे.


कोविड १९ लसीकरण पूर्वतयारी महापालिकेमार्फत वेगाने करण्यात येत आहे. पालिका क्षेत्राच्या कृती दलाने ठरवलेल्या कार्यक्रमानुसार ही कार्यवाही सुरू आहे. या पूर्वतयारीचा आढावा अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी शनिवारी घेतला. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयापासून पाहणी दौरा सुरू झाला. त्यानंतर कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवणूक केंद्रासह विविध रुग्णालयांत निर्मित लसीकरण केंद्रांचीदेखील त्यांनी पाहणी केली. तांत्रिक बाबींची पूर्तता, मनुष्यबळ उपलब्धता, प्रशिक्षण यासह अनेक बाबींवर त्यांनी यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या.

लस साठवण केंद्र
कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पाच हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रिकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी केवळ प्रादेशिक लस साठवणूक केंद्र (आरव्हीएस) म्हणून ओळखली जाणार आहे. लसीकरण केंद्र आणि कोल्ड स्टोरेज येथे सुमारे १० लाखांहून अधिक लस ठेवण्याची क्षमता आहे.

आठ रुग्णालयांची केंद्र म्हणून झाली निवड
परळ येथील केईएम, सायन रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे भाभा रुग्णालय, सांताक्रुझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही आठ लसीकरण केंद्रे आहेत.

पूर्वतयारीत उणीव न ठेवण्याचे निर्देश
कोरोनावरील लस प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या पूर्वसूचनेने प्रत्यक्ष लसीकरण सुरू करता येईल, अशी तयारी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने ठेवली आहे. मात्र लसीकरण पूर्वतयारीमध्ये कोणतीही उणीव, कमतरता राहू नये, याची पुन्हा खातरजमा करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: Vaccination begins within 24 hours of approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.