मुंबई : मुंबई शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘क्लीन अप’ फाउंडेशनतर्फे नुकतीच मोफत लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली. भामला फाउंडेशनच्या सहकार्याने १३ ते १७ जुलै दरम्यान वांद्रे पश्चिमेकडील पीस हेवन परिसरात पार पडलेल्या या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
क्लिन-अप फाउंडेशनच्या सहसंस्थापक संजना रुणवाल, अभिनेता अर्जुन कपूर आणि भामला फाउंडेशनच्या सहर भामला यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन झाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उपस्थिती दर्शवत या उपक्रमाचे कौतुक केले. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी संजना रुणवाल यांनी सफाई कर्मचाऱ्यांकरिता हाती घेतलेल्या कार्याचा गौरव म्हणून फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना संजना रुणवाल म्हणाल्या की, सफाई कर्मचाऱ्यांमधील युवा वर्ग लसीकरणापासून वंचित राहिल्याचे आमच्या लक्षात आले. या कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप असे आहे की, त्यांना कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यांची घरेही अत्यंत छोटी असल्याने त्यांच्यामार्फत कुटुंबातील प्रत्येकाला कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आम्ही सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.
अभिनेता अर्जुन कपूर म्हणाला की, या उपक्रमाचा भाग होण्याचे सौभाग्य मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. मुंबईचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे.
सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी संजना रुणवाल यांनी क्लिन-अप फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. जलनिर्जंतुकीकरण यंत्रांचे वाटप, सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य देण्यास पावसाळ्यापूर्वी रेनकोट आणि गमबूट देऊन त्यांच्या आरोग्य सुरक्षेची काळजी घेण्याचा प्रयत्नही त्या करतात. त्याशिवाय कित्येक सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी आरोग्य विमा काढून दिला आहे. तसेच त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी शिबिरांचे आयोजनही केले आहे. पुढील टप्प्यात सफाई कर्मचाऱ्यांकरिता परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे संजना यांनी सांगितले.