Join us

Corona Vaccination: मुंबईत लसीकरणाची मोहीम नोव्हेंबर अखेरपर्यंत होणार फत्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 7:38 AM

वेगाने लसीकरण करण्याचे लक्ष्य; पालिका आयुक्तांनी दिली माहिती

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी १८ वर्षांवरील ९० लाख मुंबईकरांचे वेगाने लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. दररोज सरासरी ८० हजार ते एक लाख नागरिकांना लस देण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत ७६ लाख नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. यापैकी १९ लाख नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीम नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी दिली.ऑगस्ट अखेरीपर्यंत तिसरी लाट धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला होता. यासाठी एक कोटी लसीच्या खरेदीकरिता पालिका प्रशासनाने जागतिक स्तरावर निविदा मागविली होती. परंतु, सर्व आठ निविदाकार बाद ठरल्यामुळे हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला, तर केंद्राकडून लस मिळण्यास काही वेळा विलंब होत असल्याने त्याचा परिणाम या मोहिमेवर होत आहे.सध्या पालिका, सरकारी आणि खासगी अशा ४३२ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. १८ वर्षांवरील ९० लाख नागरिकांना एकूण एक कोटी ८० लाख डोसची गरज आहे. सध्याच्या वेगाने नोव्हेंबरअखेरपर्यंत सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. खासगी रुग्णालयांकडेही लाखो डोस उपलब्ध आहेत. खासगी संस्था सीएसआर फंडाच्या माध्यमातूनही लसीकरण करण्यास सुरुवात केल्याने संपूर्ण मुंबईचे लसीकरण पूर्ण होईल असेही ते म्हणाले.६१ % मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस सद्य:स्थितीत पात्र ९० लाख नागरिकांपैकी ७६ लाख नागरिकांनी कोविड प्रतिबंधक पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण ६१ टक्के आहे, तर १९ लाख नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.मॉल, रेस्टॉरंट, जीममध्येही क्यूआर कोड ग्राह्य?लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर मिळणारे क्युआरकोड प्रमाणपत्र आगामी काळात मॉल, रेस्टॉरेंट, जीममध्ये ग्राह्य मानले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाबाबत गैरसमज न ठेवता लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांनी मानवाच्या शरीरात कोरोना विषाणू प्रतिबंधक रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते. त्यामुळे रेल्वे प्रवासाच्या अटीमध्येही दोन डोसनंतर १४ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या