Join us

मुंबई विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:07 AM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (मुंबई) कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी टर्मिनल १ वर विशेष लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली ...

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (मुंबई) कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी टर्मिनल १ वर विशेष लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व घटकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याच्या सूचना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडून प्राप्त झाल्यानंतर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई विमानतळ कर्मचाऱ्यांसह या आस्थापनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींना याचा लाभ घेता येणार आहे. या आधी विमानतळ कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. २९ मार्च रोजी सेव्हन हिल्स रुग्णालयात पहिली फेरी पार पडली. त्यात ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यात कंत्राटी कामगारांचाही समावेश होता. त्यानंतर, २ मे रोजी मुंबई पालिकेच्या सहकार्याने दुसरी फेरी पार पडली.

आता तिसरी फेरी केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता, विमानतळावरच कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी टर्मिनल १वर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, शिवाय लसीकरणासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा, काउंटर्स, हेल्प डेस्कसह पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण सुरळीत पार पडण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. १८ वर्षांवरील सर्व कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. लीलावती मेडिसिन आणि डॉ.मीणा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम पार पडेल, अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.