- मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-बोरिवली (प) येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात कोविड मुळे येथील नाट्यगृह बंदच आहे. त्यामुळे येथील जागेचा योग्य वापर करत आता या नाट्यगृहात कोविड लसीकरण केंद्र आज पासून सुरू झाले. नाट्यगृहात लसीकरण केंद्र सुरू होण्याची पश्चिम उपनगरातील पहिलीच घटना आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते व माजी महापौर हरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीत दि,11 मार्च 2001 साली सदर नाट्यगृह सुरू झाले होते.सदर नाट्यगृह हे पश्चिम उपगरातील नाट्यरसिक प्रेमिकांचे आधारवड होते. मात्र आता कोविड मुळे पुन्हा एकदा नागरिक येतील ते येथे लसीकरण करण्यासाठी.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार आमदार, विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या प्रयत्नांनी बोरिवली (प) प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथील लसीकरण केंद्राचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते ( दूरदृश्य प्रणाली द्वारे) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुंबई महापालिका सर्व 227 प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करीत आहे. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे प्रतिपादन उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
याप्रसंगी आमदार, विभागप्रमुख विलास पोतनीस, स्थानिक आमदार मनिषा चौधरी, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी ,प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, शिवसेनेच्या प्रवक्त्या व नगरसेविका शितल म्हात्रे, नगरसेविका गीता सिंघण, नगरसेवक प्रविण शहा, नगरसेविका बीना दोशी, नगरसेवक जितेंद्र पटेल, नगरसेवक जगदिश ओझा, नगरसेवक विद्यार्थी सिंह, परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार , आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. कवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सुरु करण्यात आलेले आर - मध्य विभागातील जम्बो लसीकरण केंद्र असून जून महिन्यानंतर लस उपलब्ध झाल्यास रोज सुमारे ४०० नागरीकांना येथे लसीकरणाचा लाभ घेता येईल अशी माहिती आमदार विलास पोतनीस यांनी लोकमतला दिली.