लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लसीकरण मोहीम मुंबईत वेगाने सुरू असून, आतापर्यंत ९९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र दिवाळीनिमित्त चार दिवस सुट्ट्या असल्याने लसीकरण मोहीमही बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर ४ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस मिळणार नाही.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत एक कोटी ४२ लाख ६२ हजार ५१३ नागरिकांना लस मिळाली आहे. यापैकी ८८ लाख नागरिकांना पहिला डोस तर ५३ लाख ६३ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दिवाळीपर्यंत मुंबईत सर्व नागरिकांना पहिला डोस मिळेल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार आता पहिला डोस अद्यापही न घेतलेल्या एक टक्का नागरिकांचा शोध सुरू आहे.
आतापर्यंत ६० टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण मुंबईकरांचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. त्यानुसार फिरती वाहन सेवा सुरू करण्यात आली असून, झोपडपट्टी व इमारतींमधील लसीपासून वंचित नागरिकांना शोधून त्यांना डोस दिला जात आहे. सध्या महापालिकेकडे कोविड प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारी ८ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम पूर्ववत होणार आहे.
मुंबईत आतापर्यंत झालेले लसीकरणnआरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर्स - ७,५३,९२० nज्येष्ठ नागरिक - २०५६०१०n४५ ते ५९ वर्षे - ३५२६५५६n१८ ते ४४ वर्षे - ७८५४४६६nस्तनदा माता - १३,०३४nगर्भवती महिला - २,८५०nकोविशिल्ड - १२७८४९०२ nकोव्हॅक्सिन - १४२३०५६nस्पुतनिक - ५४,५५५