मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:12+5:302021-07-10T04:06:12+5:30
पालिका, सरकारी केंद्रांमध्ये आज लस नाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने सलग ...
पालिका, सरकारी केंद्रांमध्ये आज लस नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येणार आहे. सरकारी आणि पालिका केंद्रांवर शनिवारीदेखील लसीकरण होणार नाही, असेेेे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शनिवारी ८५ हजार लसींचा साठा मुंबईला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारपासून लसीकरण मोहीम पुन्हा सुरू होऊ शकेल.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५९ लाख लोकांनी लस घेतली आहे. गेले काही दिवस लसींचा साठा सुरळीत सुरू असल्याने दररोज सरासरी एक लाखाहून अधिक नागरिकांना लस मिळत होती. मात्र, या आठवड्यात केंद्राकडून मर्यादित साठा उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. गुरुवारी काही मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.
लसींचा साठा संपुष्टात आल्यामुळे शुक्रवारी पालिका आणि सरकारी केंद्रातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. शुक्रवारी लसींचा साठा मिळेल, अशी अपेक्षा महापालिकेला होती. मात्र, केंद्रातून आता शनिवारी दुपारपर्यंत ८५ हजार लसींचा साठा येणार आहे, तर रविवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी केंद्रे बंद ठेवण्यात येत असल्याने लसीकरण मोहीम सोमवारीच पूर्ववत होईल.
(लसीकरण बंद असल्याने शुक्रवारी दादर पारशी कॉलनी येथील लसीकरण केंद्रावरून परतणारा मुंबईकर. छाया : दत्ता खेडेकर)