कोरोना केंद्रांतही लसीकरण; २५ कक्ष उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 07:28 AM2021-01-05T07:28:50+5:302021-01-05T07:29:05+5:30
केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात. मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदार एकॉन यांना सोमवारी रात्रीपर्यंत हे केंद्र पालिकेच्या स्वाधीन करण्यास सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत लसीकरण प्रक्रियेचा आवाका पाहता आता रुग्णालयांसह कोरोना केंद्रांनाही लसीकरण प्रक्रियेत सहभागी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, नेस्को, वांद्रे-कुर्ला संकुल आणि एनएससीआय येथील कोरोना केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून या केंद्रांमध्ये लसीकरणासाठी २५ कक्ष उभारण्यात येणार आहेत.
केंद्राकडून लसीला मान्यता मिळाल्यानंतर कोणत्याही क्षणी लस उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे यासाठी पालिका यंत्रणाकडून मोठ्या प्रमाणात पूर्वतयारी सुरू आहे. गोरेगाव नेस्को कोविड सेंटरमध्ये १० कक्ष उभारले जाणार आहेत. यात लस साठवणूक कक्ष, लस टोचण्यासाठीची रूम आणि एक रुग्ण देखरेख रूम असे हे युनिट असणार आहे.
आजपासूनच हे युनिट तयार करण्यास आम्ही सुरुवात केली असून आठवड्याभरात काम पूर्ण होईल, अशी माहिती नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंड्राडे यांनी दिली आहे. तर बीकेसी असे १५ कक्ष उभारण्यात येणार असल्याचे केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र डेरे यांनी सांगितले.
nमुंबईत पहिल्या टप्प्यात अंदाजे दीड लाख कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. तर त्यानंतर सुमारे पाच लाख फ्रंटलाइन कोरोना वॉरिअर्सना लस टोचली जाणार आहे.
nपालिकेतर्फे आठ लसीकरण केंद्र उभारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्यासह मोठ्या कोरोना केंद्रातही लसीकरणासाठी सेवा उपलब्ध करण्यात यावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
मुंबईत दररोज ५० हजार व्यक्तींना लस
nमुंबईत कोरोना लसीकरणासाठी महापालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर आता लसीकरण केंद्रांची संख्या ५० वरून १०० करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. त्यामुळे दरदिवशी ५० हजार व्यक्तींना लस देणे शक्य होणार आहे. त्यासाठी शाळा, शासकीय कार्यालयांसह जम्बो कोरोना सेंटर्सचा वापर लसीकरणासाठी करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
nदररोज १० हजार व्यक्तींना लस देण्याची तयारी यापूर्वी केली होती. मात्र, आता दरदिवशी ५० हजार जणांना लस देण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले आहे. प्रत्येक विभागात दोन याप्रमाणे ५० केंद्रांचे नियोजन होते. मात्र, आता एका विभागात पाच केंद्र असे १०० केंद्रे तयार करण्यात येणार आहेत.
‘कूपर’चे माॅडेल लसीकरण केंद्र सज्ज
पालिकेच्या डॉ. आर.एन. कूपर रुग्णालयाच्या उपाहारगृहाच्या समोर चार हजार चौरस फूट इमारतीचे २९ डिसेंबरपासून त्याचे मॉडेल लसीकरण केंद्रात रूपांतर करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार, कूपर रुग्णालयात मॉडेल केंद्र तयार करण्यासाठी आता ३०हून अधिक मजूर रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करत आहे.
मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदार एकॉन यांना सोमवारी रात्रीपर्यंत हे केंद्र पालिकेच्या स्वाधीन करण्यास सांगितले आहे. येत्या शुक्रवारपासून पूर्णपणे काम करण्यास तयार असल्याचे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकीन गुज्जर यांनी ही माहिती दिली. या केंद्रात भूलतज्ज्ञ, श्वसनविकारतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांचा सहभाग असेल. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात पालिकेच्या सात रुग्णालयांसह कूपर रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे.
या लसीकरण केंद्रात प्रवेशद्वारानजीक प्रतीक्षा केंद्र आहे. तसेच तीन लसीकरण कक्षांची उभारणी करण्यात आली आहे, एका कक्षात पाच जणांना लस देता येऊ शकते. या केंद्रात निरीक्षण कक्षही असून त्या ठिकाणी लस दिल्यानंतर रुग्णांचे काही काळ निरीक्षण करण्यात येईल. याखेरीज, अन्य दोन कक्ष असून या ठिकाणी स्वयंसेवकांवर काही दुष्परिणाम जाणवल्यास उपचार करण्यात येणार आहेत.