मुंबई : सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. पहिल्या लाटेत ज्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, त्या लोकांना दुसऱ्या लाटेत संसर्ग होऊ लागला आहे. अशा स्थितीत कोरोना संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करणे गरजेचे आहे. यामुळे आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो, असे तज्ज्ञांनी संगितले.
डॉ. छाया वजा म्हणाले की, लसीकरण सुरक्षित असून, संसर्गाचा धोका कमी करते, असे अनेक चाचण्यांतून समोर आले आहे. लसीचे डोस हे दोन टप्प्यात दिले जात आहेत. दुसरा डोस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात आवश्यक अँटीबॉडीज तयार होतात, ज्यामुळे कोरोनाशी लढण्यास मदत मिळते. लस घेतल्यानंतर तुम्हाला थकवा, डोकेदुखी, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणे, ताप येणे, थंडी वाजणे किंवा लसीकरणानंतर शरीर दुखणे यांसारखे दुष्परिणाम जाणवतील. पण, घाबरू नका. डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या. यामुळे तुम्ही लवकर बरे व्हाल. लसीबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मनात काही शंका असल्यास तातडीने डॉक्टरांशी चर्चा करा.
डॉ. संजय नगरकर म्हणाले की, कोरोना लसीबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. यामुळे बहुतेक लोक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. आपल्या देशात कोरोनाच्या ज्या लसी दिल्या जात आहेत, त्याने कोणतेही गंभीर साइड इफेक्ट्स होत नाहीत. लस घेताना किंचितसे दुखते. दुसऱ्या दिवशी इंजेक्शनच्या जागी दंडावर सूज येते. दोन-तीन दिवसानंतर ती आपोआप कमी होते. काही व्यक्तिंना दोन दिवस ताप येतो. मात्र, ही लक्षणेही दोन-तीन दिवसात त्वरित कमी होतात. क्वचितप्रसंगी काहींना लस घेतल्यानंतर गरगरते. पण, त्यासाठी आपल्याला अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबवले जाते. मात्र, अनेकदा लस घेतल्यानंतरही काहीही त्रास जाणवत नाही. याचा अर्थ त्याच्यावर लसीचा परिणाम झाला नाही, असे नाही.
----------------------
अशी तयार होते रोग प्रतिकारशक्ती
१. रोग प्रतिकारशक्ती काही दिवस, आठवडे किंवा काही महिन्यांच्या कालावधीत विकसित केली जाते.
२. लस घेतल्यानंतर १३-१४ दिवसांनी त्याच्या शरीरात बी पेशी म्हणजे अँटीबॉडीज विकसित होण्यास सुरुवात होते. पण, त्या अद्याप सुरक्षा पातळीपर्यंत पोहोचलेल्या नसतात.
३. त्यानंतर कमीत कमी दोन ते तीन आठवडे अँटीबॉडीज निर्माण होत राहतात. विशेषतः लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज कित्येक महिने, अगदी वर्षभरदेखील निर्माण होत राहतात.
४. लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होणार नाही, असे नाही. परंतु भविष्यात हा आजार झाल्यास गुंतागुंत कमी होते.