Join us

सायन रुग्णालयातील लसीकरण स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी ही कोरोनाचा संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात ...

मुंबई : मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी ही कोरोनाचा संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन, शिव रुग्णालयामधील लसीकरण केंद्र अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे.

नागरिकांच्या तक्रारीनुसार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांबरोबर सामोपचाराने चर्चा करत, लसीकरण केंद्र अन्य जागेत हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता शिव रुग्णालयातील लसीकरण केंद्र हे समोरील लिटिल एंजल शाळेत हलवण्यात आले आहे. त्यामुळे प्रशस्त मोकळ्या जागेतील या केंद्रात लस घेता येत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

एफ-उत्तर विभागातील शिव रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले; पण हे लसीकरण केंद्र अपघात विभागाच्या बाजूच्या वॉर्डमध्ये सुरू करण्यात आले होते. या अपघात विभागात येणारे रुग्ण पाहून, लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण व्हायची. तसेच लसीकरणाची जागा अपुरी असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. या गर्दीमुळे कोरोनाच्या संसर्गाची भीतीही व्यक्त केली जात होती.

याविषयी शिव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. सामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. गर्दी मोठ्या प्रमाणात व्हायची, त्यामुळे काही तक्रारी येत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्र लिटिल एंजल स्कूलच्या जागेत हलवण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याठिकाणी दरदिवशी एक हजार नागरिकांचे लसीकरण व्हायचे. शिव रुग्णालयातील केंद्राच्या जागेपेक्षा ही जागा प्रशस्त आणि मोकळी आहे.