पालिकेने घेतली मागणीची दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्राधान्याने लस दिली जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई महानगर पालिकेने सुधारित पत्रक जारी केले. यामुळे मुंबईतून परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेच्या प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालिका आयुक्तांनी लसीकरणाची विशेष व्यवस्था राबवावी, अशी मागणी केली होती. तर मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनीही ९ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने लसीकरण मोहीम सुरू करा, अशी मागणी केली होती.
राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साेमवारपासून लसीकरण सुरू होत असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली होती. तर शीतल म्हात्रे यांनी युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई व पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे ही बाब मांडून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरू करण्याची मागणी केली होती. शीतल म्हात्रे यांच्या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने शुक्रवारी रात्री उशिरा सुधारित परिपत्रक जारी केले.
१८ ते ४४ वयोगटातील मुंबईचे रहिवासी असलेल्या व उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वैध पुराव्यानिशी म्हणजे परदेश प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा तसेच व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय - २० किंवा डीएस - १६० इत्यादी असल्यास पालिकेच्या राजावाडी, कस्तूरबा किंवा कूपर हॉस्पिटलमध्ये थेट जाऊन साेमवारपासून लसीकरण करता येईल, असे पालिकेच्या सुधारित पत्रकात नमूद आहे. ‘लोकमत’ने पाठपुरावा करुन हा विषय लावून धरल्याबद्दल नगरसेविका शीतल म्हात्रे व ॲड. शिरीष देशपांडे यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
------------------------------