Join us

धारावीत केवळ ११ टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:08 AM

मुंबई : मुंबईत सर्वाधिक संसर्गाचे केंद्र असणाऱ्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाच्या दोन्ही लाटांत धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा तीव्र संसर्ग झाल्याचे दिसून ...

मुंबई : मुंबईत सर्वाधिक संसर्गाचे केंद्र असणाऱ्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाच्या दोन्ही लाटांत धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा तीव्र संसर्ग झाल्याचे दिसून आले, मात्र लाटा नियंत्रणात आल्यानंतर आता या ठिकाणी लसीकरणाला वेग मिळणे अपेक्षित होते. परंतु, या ठिकाणी केवळ ११ टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण झाल्याचे समोर आले आहे.

धारावीत जवळपास सात लाख लोकसंख्या असून, यातील केवळ ११ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. धारावीतील आतापर्यंत ७६ हजार जणांना लस दिली गेली आहे. यात सुमारे ६० टक्के लसीकरण हे पालिकेच्या केंद्रांवर, तर ४० टक्के हे जुलैपासून सीएसआरद्वारे प्राप्त झालेल्या लसींच्या माध्यमातून झाले आहे.

लसीबाबतची भीती, गैरसमज यामुळे धारावीमध्ये लसीकरणाला सुरुवातीला विशेष प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे धारावीमध्ये स्वतंत्र लसीकरण केंद्र पालिकेने सुरू केले. मार्चमध्ये येथे केवळ १,३४९ जणांनी लस घेतली होती. यानंतर पालिकेने लससाक्षरता करण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली आणि लसीकरणाचा प्रतिसाद वाढला. त्यामुळे एप्रिलमध्ये ही संख्या १० हजार ६४८ वर गेली. लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यासाठी धारावीत आणखी दोन केंद्रे सुरू करण्यात आली. मे महिन्यात पालिकेला लसींचा साठाच कमी प्रमाणात मिळाल्यामुळे लसतुटवडा निर्माण झाला. परिणामी, तीन केंद्रे असूनही धारावीत मेमध्ये ८,३८९ जणांचे लसीकरण झाले.

याविषयी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, धारावीतील लसीकरणाला वेग आणण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती सुरू आहे. शिवाय, पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसऱ्या डोसकरिता विलंब करू नये यासाठीही विशेष प्रयत्न सुरू आहेत. लसीच्या साठ्याचे नियमन झाल्यास येथील लसीकरण मोहिमेला वेग मिळेल.