मुंबईत आज केवळ ५८ केंद्रांवर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:47+5:302021-07-20T04:06:47+5:30
लसींच्या मर्यादित साठ्यामुळे निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लसींच्या मर्यादित साठ्याचा फटका पुन्हा मुंबईतील लसीकरण मोहिमेला बसणार आहे. ...
लसींच्या मर्यादित साठ्यामुळे निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लसींच्या मर्यादित साठ्याचा फटका पुन्हा मुंबईतील लसीकरण मोहिमेला बसणार आहे. सध्या महापालिकेकडे उपलब्ध लसींचा साठा कमी असल्याने मंगळवारी ३०९ पैैकी ५८ निवडक पालिका आणि शासकीय केंद्रांवर लस मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६५ लाख २४ हजार ८४१ नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी ५० लाख २८ हजार लोकांनी कोविड प्रतिबंध लसीचा पहिला डोस आणि १४ लाख ९६ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दररोज एक लाख लोकांना लस देण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे.
पालिका, सरकारी आणि खासगी केंद्रांमध्ये मंगळवारी ७६ हजार नागरिकांनी लस घेतली. मात्र केंद्राकडून लसीचा नवीन साठा आलेला नाही. त्याचा परिणाम मंगळवारी होणाऱ्या लसीकरण मोहिमेवर होणार आहे. परंतु, लवकरच केंद्रांतून लसींचा साठा येण्याची शक्यता असल्याने बुधवारपासून लसीकरण मोहीम सुरळीत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.