Join us

राज्यातील पोलिसांचे लसीकरणही संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:09 AM

जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना लढ्यात आरोग्य सेवकांच्याबरोबरीने नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचे ...

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना लढ्यात आरोग्य सेवकांच्याबरोबरीने नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. फ्रंटलाईन वर्कर असलेल्या या घटकातील जवळपास १५ हजार जणांनी अद्याप पहिला डोस घेतलेला नाही. तर ५० हजार जणांचा दुसरा डोस शिल्लक आहे.

लसीच्या अपुऱ्या पुरवठ्याबरोबरच पोलिसांमध्ये लसीकरणाबाबत काहीशी शिथिलता आली आहे. पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करण्यात आली होती. त्यासाठी केंद्राने राज्यातील अप्पर महासंचालक (आस्थापना) के. के. शारंगल यांना समन्वयक अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. एक जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘ड्रायरन’ मध्येही पोलिसांचा समावेश होता. मात्र, आठ महिने होत आले तरी पोलिसांचा अद्याप लसीचा पहिला डोसही पूर्ण झालेला नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लसीकरणासाठी मुंबईसह राज्य पोलीस दलातील एकूण २ लाख अधिकारी-अंमलदारांनी नोंदणी केली आहे. ५ ऑगस्टपर्यंत त्यापैकी १ लाख ८५ हजारजणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दीड लाख जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.

दोन डोसमधील अंतर सुरुवातीला २८ दिवसांचे होते. त्यानंतर ४ ते ६ आठवड्यांचे व अखेर ८३ दिवसांवर करण्यात आले. जर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पोलिसांचे पूर्ण क्षमतेने लसीकरण झाले असते तर आतापर्यंत सर्व पोलिसांची दोन्ही डोसची प्रक्रिया पूर्ण झाली असती.