मुंबई - कोविड प्रतिबंधक लसीकरणात स्तनदा मातांना समाविष्ट केल्यानंतर आता गर्भवती महिलांनाही लस देण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत ३,५९१ स्तनदा मातांनी पहिला डोस घेतला आहे. तसेच महापालिकेच्या ३५ लसीकरण केंद्रांवर गुरुवारपासून लस देण्यास सुरुवात होणार आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६१ लाख ६८ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, १८ वर्षांवरील सर्व नागरिक, स्तनदा माता अशा सर्वांचे लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार केंद्राने गर्भवती महिलांनाही आता लसीकरणात समाविष्ट केले आहे.
यामुळेच गर्भवती महिलांचे लसीकरण...
गर्भवती महिलांना तीव्र संसर्गाचा धोका असतो. गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसूती होण्याचे प्रमाण अधिक आहे. दहा टक्के गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकारशक्तीविषयक औषधोपचार, डायलेसिस, हृदयरोग अशामुळे कोविड होण्याचे प्रमाण वाढते. या बाबींपासून गर्भवती महिल व होणाऱ्या बाळाचा बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेणे फायदेशीर ठरू शकते.
गर्भवती महिलांसाठी नियम...
* गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत लस घेऊ शकतात. पूर्ण माहितीपश्चात स्वेच्छेने लस घ्यावी.
* कोविड होऊन गेलेल्या गर्भवती महिलांना ‘मोनॉक्लोनल ॲन्टिबॉडीज’ प्लाझ्मा हा उपचार घेतलेला असल्यास १२ आठवड्यानंतर लस घ्यावी.
येथे मिळेल लस...
कामा रुग्णालय, नायर रुग्णालय, भायखळा - जगजीवनराम पश्चिम रेल्वे रुग्णालय, जे. जे. रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रुग्णालय, मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा, सायन रुग्णालय, केईएम, एम.जी.एम. रुग्णालय, नायगाव प्रसूतीगृह, माहीम प्रसूतीगृह, ईएसआयएस रुग्णालय वरळी, देसाई रुग्णालय सांताक्रूझ (पूर्व), भाभा रुग्णालय, वांद्रे (पश्चिम), कुपर रुग्णालय, शिरोडकर प्रसूतीगृह, कुर्ला भाभा, माँ साहेब मीनाताई ठाकरे प्रसूतीगृह, चुनाभट्टी, देवनार प्रसूतीगृह, मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतीगृह, राजावाडी रुग्णालय, आकुर्ली प्रसूतीगृह कांदिवली
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालय, कांदिवली (पश्चिम) इ. एस.आय.एस. रुग्णालय, कांदिवली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रुग्णालय, मुलुंड (पूर्व).