लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी रुग्णालयांनाही आता लसीकरणाची परवानगी मिळणार आहे. याची सुरुवात १५ फेब्रुवारीपासून होणार आहे. त्यानुसार २० खासगी रुग्णालयांना सुरुवातीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी ६१ टक्के आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
मुंबईत १६ फेब्रुवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ८७ हजार ४१६ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील २० हजार ३०९ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील ज्येष्ठ आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येईल. त्यानंतर १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी २२ लसीकरण केंद्रांवर १० हजार ४०० लाभार्थ्यांपैकी सहा हजार ३६१ म्हणजे ६१ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली. यापैकी लसीचे सर्वाधिक प्रमाण नायर रुग्णालयात १०९० एवढे होते. त्यापाठोपाठ अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ८०९ आणि केईएम रुग्णालयात ७७५ कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
* २० खासगी रुग्णालयांना पालिकेची परवानगी
- १ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लागणार असल्याने खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार येत्या सोमवारपासून २० खासगी रुग्णालयांना सुरुवातीला फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- खासगी रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी महापालिका लस पुरविणार आहे. मात्र, लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि यंत्रणा या रुग्णालयांनी स्वतः उभ्या करायच्या आहेत.
-----------------------