हेल्पडेस्कच्या माध्यमातून होते आहे लसीकरण नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:04 AM2021-07-05T04:04:57+5:302021-07-05T04:04:57+5:30
मुंबई : लस घेण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप दिले आहे. त्यात लसीकरण नोंदणी करता येते. स्लॉट बुक करता ...
मुंबई : लस घेण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप दिले आहे. त्यात लसीकरण नोंदणी करता येते. स्लॉट बुक करता येतो. झोपडपट्टी, चाळी, आदिवासी पाड्यात राहणाऱ्या अनेक नागरिकांना या प्रक्रियेबद्दल आणि ॲपबद्दल माहिती नाही. माहिती असली तरी इंटरनेट आणि मोबाईल सुविधा नसल्याने नोंदणी करता येत नाही. ही सर्व प्रक्रिया समजून सांगण्यासाठी, लसीबाबत नागरिकांचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी युवा संस्थेने मुंबईत जागोजागी हेल्पडेस्क सुरू केले आहेत.
हेल्प डेस्कच्या माध्यमातून लसीकरण करण्यासाठी लोकांची नोंदणी केली जाते. लस घेण्याबाबत लोकांचे असणारे गैरसमज दूर केले जात आहेत. लस सुरक्षित आहे हे पटवून दिले जात आहे, अशी माहिती युवा संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प सहायक नामदेव गुलदगड यांनी दिली. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लसीकरण मोहीम हातात घेतली. लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी जमत आहे. परंतु, लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना ती घेता येत नाही. परिणामी हा उपाय योजला गेल्याचे त्यांनी सांगितले.