लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेरोना प्रतिबंधक लसीकरणाला राज्यात पुन्हा उद्या, मंगळवारपासून लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार व शनिवार असे आठवड्यातील चार दिवस लसीकरण सुरू राहणार आहे.
राज्यासह देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास शनिवारी प्रारंभ झाला. त्यानंतर दिवसभरात राज्यात सुमारे ६५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. राज्यात नऊ लाख ६३ हजार लसींचा डोस प्राप्त झाला. त्याशिवाय भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’च्या २० हजार लशी मिळाल्या होत्या. राज्यात सात लाख ८७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची कोविनवर नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्यात ५५१ ऐवजी २८५ लसीकरण केंद्रे निश्चित करून त्या ठिकाणी लसीकरण सुरू झाले. रविवार, सोमवार हे दोन दिवस लसीकरण करण्यात येणार नसल्याचे आरोग्य खात्याने शनिवारी रात्री उशिरा जाहीर केले. को-विन ॲपमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने त्याबाबत केंद्र सरकारचे पुढील आदेश येणे अपेक्षित होते. त्यानुसार पुढील आदेशानंतरच लसीकरण सुरू केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
केंद्र सरकारने रविवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी रविवार, सोमवार, गुरुवारी लसीकरण होणार नाही. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातील चार दिवस लसीकरण होईल. सोमवार आणि गुरुवार राज्य सरकारच्या आरोग्य खात्यातील कामे करता यावीत, कोवि ॲपमध्ये नावे अपलोड करता यावीत यासाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे आठवड्यातील चार दिवसच लसीकरण सुरू राहणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी दिली.
राज्यातील सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस पूर्ण झाल्यावर २८ दिवसांनी दुसरा डोस देण्याचे नियोजन आहे. दुसरा डोस दिल्यानंतरच लसीकरणाच्या पुढील टप्प्याबाबत केंद्र सरकार निर्देश देईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
...................