पोलिसांकडून चौकशी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवलीत कोविडची लस देण्याचा दावा करीत एका इसमाने जवळपास ४०० जणांकडून हजारो रुपये उकळले. एका नामांकित रुग्णालयाच्या नावे देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची अधिकृतता पडताळल्यानंतर ते बनावट असल्याचे समजले. या प्रकरणी कांदिवली पोलिसांकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे.
कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी लसीकरण आयोजित करण्यात आले होते. महेंद्र सिंह नामक एक व्यक्ती याचा आयोजक होता. हे लसीकरण नामांकित रुग्णालयाकडून आयोजित करण्यात आल्याचा दावा त्याने केला. मात्र लसीकरणानंतर अवघ्या चार तासांत मिळणारे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले नाही. मुख्य म्हणजे यातील एकालाही लसीकरणानंतर जाणवणारा ताप, अंगदुखीसारखा त्रास जाणवला नाही. त्यानंतर काही स्थानिकांना परदेशी जायचे असल्याने त्यांनी सिंहकडे प्रमाणपत्राची मागणी केली.
तेव्हा गोरेगावच्या नेस्को सेंटरसह अनेक नामांकित रुग्णालयांच्या नावाने त्यांच्या मोबाइलवरील ओटीपी मागून ही प्रमाणपत्रे देण्यात आली. हा सगळा प्रकार संशयित वाटल्याने त्यातील काहींनी एका मोठ्या रुग्णालयात याबाबत चौकशी केली तेव्हा असे कोणतेही लसीकरण झालेलेच नाही; मात्र प्रमाणपत्र अधिकृत असून त्यावर तारीख दहा ते बारा दिवसांनंतरची असल्याने गोंधळ वाढला आहे.
मग आम्हाला कसले इंजेक्शन दिले?
सोसायटीमध्ये राहणारे हितेश पटेल यांच्या म्हणण्यानुसार, जर आम्हाला कोरोना लस दिली गेली नाही, तर मग ते इंजेक्शन नेमके कसले होते? या गोष्टीचा विचार करीत स्थानिकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पटेल यांच्या मुलानेदेखील ती लस घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कॅम्पदरम्यान कोविशिल्ड वायल काही नागरिकांनी पाहिली होती. ज्यावर ‘नॉट फॉर सेल’ लिहिल्याचे त्यांचे म्हणणे असून, यात पालिका तसेच प्रशासनाच्या लोकांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तेव्हा बळावला संशय!
सोसायटीतील ज्या नागरिकांनी लस घेतली त्यांचे ‘कोविन’ साईटवर रजिस्ट्रेशन केले गेले नाही. त्यांना फोटो काढण्यास परवानगी दिली नाही. लसीकरणासाठी प्रत्येकी १,२६० रुपये आकारले गेले ज्याचे बिलही देण्यात आले नाही. प्रमाणपत्र देण्यासही टाळाटाळ करण्यात आली. तसेच अजूनही १०० हून अधिक लोकांना अद्याप प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याने याबाबत सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.
चौकशी सुरू,
संशयित पसार
या प्रकरणी लेखी तक्रार मिळाली असून याबाबत चौकशी सुरू असल्याचे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच ज्याच्याविरोधात तक्रार केली गेली आहे तो सध्या पसार असून पोलीस शोध घेत आहेत.