मुंबई : एकीकडे मुंबईसह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा संपला असताना गोरेगाव पूर्व येथील नेस्को कोविड सेंटर आणि दहिसर पूर्व येथील कोविड सेंटरमध्ये लसीचा साठा उपलब्ध होता. नेस्को कोविड सेंटरमध्ये तीन दिवस इतका लसीचा साठा उपलब्ध असल्याची माहिती येथील अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.
आज नेस्को येथे ४५ ते ५९ वर्षांचे नागरिक, ६० वर्षांवरील नागरिक तसेच अनेक वृद्धांनीसुद्धा लस घेतली. येथे लसीकरणाची व्यवस्था सुरळीत सुरू होती. लस घेतल्यानंतर नागरिकांसाठी चहा, कॉफी आणि पाण्याची व्यवस्था होती. तर लस घेतल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत झाला.
अनेक नागरिक व महिला येथील सेल्फी पॉइंटवर आपल्या मोबाइलमध्ये फोटो बंदिस्त करत होते. तर लस घेतल्यावर प्रमाणपत्र एसएमएसद्वारे येत होते. दहिसर कोविड सेंटरमध्ये आम्ही लसीचा साठा केला असून आज येथे लसीकरणाचे काम सुरळीत सुरू होते. आज अनेकांनी येथे लस घेतली, अशी माहिती डॉ. दीपा श्रीयान यांनी दिली.
--------------------------------------------------