लसीकरणाची कासवगती! मर्यादित साठ्यामुळे मनस्ताप, केंद्रांवर रांगाच रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 07:17 AM2021-05-09T07:17:38+5:302021-05-09T07:18:33+5:30
मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लसींचा डोस दिल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी होईल, अशी सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे लसीकऱणाला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करणे अपेक्षित आहे; मात्र...
मुंबई : लसीच्या मर्यादित साठ्यामुळे शहर उपनगरातील लसीकरण प्रक्रिया कासवगतीने सुरू असून, यामुळे लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केवळ नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच लस मिळेल, असे घोषित करूनही लाभार्थी शहर उपनगरातील लसीकरण केंद्रांवर रांगा लावत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे, नोंदणीच्या प्रक्रियेतही अवघ्या २-३ मिनिटात स्लॅट आरक्षित होत असल्याने लाभार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. (The Vaccination speed in very slow due to limited stock of vaccine )
मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लसींचा डोस दिल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी होईल, अशी सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे लसीकऱणाला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करणे अपेक्षित आहे; मात्र प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर मोठ्या रांगा, नोंदणी न होणे, दुसऱ्या डोसचा तुटवडा, लस न मिळाल्याने परत जाणे अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. वांद्रे कुर्ला जम्बो कोविड केंद्र, नेस्को अशा केंद्राप्रमाणेच अन्य लसीकरण केंद्राची क्षमता वाढविली पाहिजे, तसेच नोंदणीची प्रक्रिया सुलभ केली पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मुंबईत ज्यावेळेस लस उपलब्ध होतात. त्यानुसार तातडीने लसीकरण केंद्रावर लस पुरवठा करण्यात येत आहे. आता १ तारखेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू असल्यामुळे अधिकाधिक लसी प्राप्त व्हाव्यात, त्यासाठी प्रयत्न आहेत, त्याकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करणे सुरू आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
आतापर्यंतचे लसीकरण -
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १७८९६० १११००४
फ्रंटलाइन वर्कस २२३१३० ११७१२७
ज्येष्ठ नागरिक ७८०२६१ २७५६७०
४५ ते ५९ वयोगट ८१६७४७ १०२०७९
१८ ते ४४ वयोगट १६९१६
लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा
कोविनवर नोंदणी करूनही लस मिळेल की नाही, याची चिंता भेडसावत असल्यामुळे नागरिक सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी करीत आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी वांद्रे कुर्ला जम्बो कोविड केंद्रात धक्काबुक्की झाल्याची घटनाही घडली होती. परिणामी, जम्बो कोविड केंद्राबाहेर आता पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, एकाच केंद्रावर वेगवेगळ्या वयोगटातील लसीकरण असल्यानेही गर्दी वाढत आहे.
९० हून अधिक लसीकरण केंद्र कार्यान्वित
पालिका- सरकारी आणि खासगी अशी मिळून संयुक्तपणे मुंबईत ९० हून अधिक लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी निश्चित केलेले पैसे घेऊन लसीकरण केले जात आहे. तर पालिका- सरकारी केंद्रांवर मोफत लसीकरण प्रक्रिया सुरू आहे.
लसींच्या तुटवड्याचा मनस्ताप
लसीच्या तुटवड्यामुळे सकाळपासून रांगेत उभे राहावे लागते. त्यात आपला क्रमांक येईपर्यंत लसीचे डोस संपेल, याचीही चिंता असते. त्यामुळे आता संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन लसीचा साठा वाढविण्यात यावा. जेणेकरून लसीकरण केंद्रांवर लस देण्याची प्रक्रिया सोपी होईल आणि लाभार्थी गर्दी करणार नाहीत.
- केशव घोष, लाभार्थी
केंद्रांची संख्या वाढविली पाहिजे
दुसरा डोस असलेल्या लाभार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. माझ्या घरातील ६२ वर्षीय आजोबांना दुसरा डोस घेण्यासाठी ५-६ दिवस थांबावे लागले. रोज केंद्रावर जाऊन पुन्हा हताश होऊन घरी यायला लागले, त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला, शिवाय लस घेण्यासाठीचा उत्साहही कमी होत चाललाय. परिणामी, लसीकरणाच्या प्रक्रियेचे सुलभीकऱण कऱण्यासाठी केंद्राची संख्या वाढवावी, लसीची उपलब्धताही वाढवावी.
- मयुर नाडकर्णी, लाभार्थी