लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सेंट जाॅर्ज रुग्णालयात नुकतेच रशियातील स्पुटनिक व्ही लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ही लस घेणाऱ्या लाभार्थ्याला कोणत्याही दुष्परिणामांना सामोरे जावे लागले नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तसेच प्रत्येक लाभार्थ्याला या लसीचे दोन डोस दिले गेले आहेत.
जानेवारी महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील स्पुटनिक व्ही लसीच्या मानवी चाचणीत सेंट जाॅर्ज रुग्णालयाने सहभाग घेतला. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीप्रमाणे या लसीचेही प्रत्येक लाभार्थ्याला २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस दिले गेले आहेत. जानेवारी २० रोजी ही चाचणी सुरू झाली असून १४४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, त्यातील दोन जणांना सौम्य ताप आल्याचे दिसून आले, मात्र कोणत्याही लाभार्थ्याला मोठ्या स्वरूपाचा दुष्परिणाम झालेला नाही. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी नुकतेच लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
याविषयी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले, सर्व १४४ लाभार्थ्यांनी लसीच्या चाचणीला उत्तम प्रतिसाद दिला, कुणीही लस घेण्यासाठी टाळाटाळ केली नाही. शिवाय, लसीच्या चाचणीनंतरही पुढील सात महिन्यांसाठी या लाभार्थ्यांची आरोग्यविषयक माहिती ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमध्येही रुग्णालय सहभागी झाले होते, यावेळी १८ लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यासाठीही खासगी रुग्णालयातील २५ डॉक्टरांनी सहभाग नोंदविला.
लस ९० टक्के उपयुक्त
वैद्यकीय जर्नल लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालानुसार, जगभरात सुरू असलेल्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीनुसार २० हजार लाभार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालात मांडलेल्या निरीक्षणाप्रमाणे कोविडविरोधात ही लस ९० टक्के उपयुक्त आहे. या लसीचा डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंडाची निर्मिती होत असून रोग प्रतिकारक शक्तीही वाढते.