मुंबई : अरबी समुद्रात येणारे ‘तौकते’ चक्रीवादळ १५ व १६ मे रोजी मुंबईच्या नजीक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मुंबईतील लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे.मुंबईकडे सध्या लसींचा साठा पुरेसा असल्याने नियमित लसीकरण केले जात आहे. सध्या ८० हजार लसींचा साठा मुंबईकडे आहे. मात्र पुढील दोन चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतही दिसण्याची शक्यता असल्याने मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणून दोन दिवशी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येणार आहे. तर १७ ते १९ मे तीन दिवस दुसरा डोस घेणारे, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांना थेट सेंटरवर जाऊन लस मिळणार आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जम्बो कोविड केंद्रांलगतच्या ३८४ झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे.३९५ रुग्णांना हलवणारतौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा उपाय म्हणून वांद्रे-कुर्ला संकुल व दहिसर येथील जंबो कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागातील रुग्णांसह ३९५ रुग्णांना महापालिकेच्या व राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये नेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. प्रामुख्याने सेव्हन हिल्स रुग्णालय, नेस्को जंबो कोविड सेंटर, सायन रुग्णालय, ट्रॉमा केअर रुग्णालय आणि राज्य शासनाच्या अखत्यारितील सेंट जॉर्ज रुग्णालय येथे त्यांना नेण्यात येईल.
चक्रीवादळामुळे मुंबईत दोन दिवस लसीकरण बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 7:13 AM