४५ वर्षांपुढील वयोगटाचे लसीकरण आज बंद; १८ ते ४४ साठी नाेंदणी आवश्यकच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 05:38 AM2021-05-03T05:38:15+5:302021-05-03T05:38:52+5:30
सध्या ६३ केंद्रे, तसेच ७३ खासगी रुग्णालये मिळून १३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाच केंद्रांवर सुरू राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पालिकेकडे लसीचा साठा अपुरा असल्याने सोमवारी ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सोमवारी नायर, बीकेसी, सेव्हर हिल, राजावाडी आणि कुपरमध्ये सुरू राहील. ज्यांनी यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे त्यानांच तेथे लस मिळेल.
सध्या ६३ केंद्रे, तसेच ७३ खासगी रुग्णालये मिळून १३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाच केंद्रांवर सुरू राहील. तेथे या वयोगटातील प्रत्येकी ५०० नागरिकांचे राेज सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण केले जाईल. सध्या तेथे लसीचा पहिला डाेस घेणाऱ्यांनाच प्राधान्य आहे. साठा उपलब्ब्ध होईल, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.
उगाचच गर्दी करू नये!
nलसीकरणासाठी ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना काही केंद्रांवर रांगेत प्रतीक्षा करावी लागते. सोमवारी ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार नाही. १८ ते ४४ वयोगटासाठी आगाऊ नाेंदणी असेल तरच लसीकरण हाेईल.
nत्यामुळे उगाचच केंद्रांवर गर्दी करू नका. काेराेना संसर्गाला आमंत्रण देऊ नका. लसीकरण केंद्रावर येताना आणि तेथे वावरताना एकावर एक दोन मास्क परिधान करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. साठा उपलब्ध हाेताच सर्व नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळेल, असेही पालिकेने स्पष्ट केले.
या पाच केंद्रांवर सुरू आहे लसीकरण
बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर)
सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय
(जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर)
सेव्हन हिल्स रुग्णालय
(अंधेरी परिसर)
वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर
राज्याला आज किंचित दिलासा
राज्यात रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूंत काहीशी घट झाली. दिवसभरात ५६ हजार ६४७ रुग्ण आणि ६६९ मृत्यूंची नोंद झाली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दैनंदिन रुग्णसंख्येत १० हजारांनी, तर मृत्यूंत १००-१५० ने घट झाली आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४७ हजार २२ हजार ४०१ झाली असून, बळींचा आकडा ७० हजार २८४ झाला आहे. सध्या राज्यात ६ लाख ६८ हजार ३५३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.