पसार मनीष त्रिपाठीचा शोध सुरू
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बनावट लसीकरणप्रकरणी शिवम रुग्णालयात डेंटिस्ट म्हणून कार्यरत असलेला मनीष त्रिपाठी हा मुख्य आरोपींपैकी एक आहे. येथे नर्सिंगसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये गुण मिळवून देताे, असे सांगून त्याने त्यांना लस देण्याचे प्रशिक्षण दिले हाेते. ताे पसार असून त्याचा शाेध सुरू आहे.
मार्च-एप्रिलदरम्यान नर्सिंगच्या प्रवेशाची प्रक्रिया झाल्यानंतर यातील विद्यार्थ्यांना त्रिपाठीने हाताशी धरले. लस देण्याचे प्रशिक्षण घेऊन शिबिरांमध्ये लस दिल्यास प्रॅक्टिकल परीक्षेत गुण मिळतील, असे आमिष शिवम रुग्णालयातील नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याने दाखवले. करीम अकबर अली हा मध्य प्रदेशचा रहिवासी सर्व गुन्ह्यांत आरोपी आहे. विशेष म्हणजे करीमने स्वतः या लसीचे दोन डोस घेतले होते. याशिवाय यात ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांनाही यात आरोपी करण्यात आले असून त्यांच्या सहभागाबाबत अधिक तपास सुरू आहे.
* या ठिकाणी झाले बनावट लसीकरण
१. कांदिवली : हिरानंदानी हेरिटेज येथे ३९० जणांचे लसीकरण.
२. बोरीवली : आदित्य महाविद्यालय बोरीवली येथे २२५ जणांचे लसीकरण.
३. बोरीवली : मानसी शेअर्स ॲण्ड स्टॉक शिंपोली बोरीवली येथे ५१४ जणांचे लसीकरण.
४. भोईवाडा : पोद्दार एज्युकेशन सेंटर परळ येथे २०७ लोकांचे लसीकरण.
५. वर्सोवा : टिप्स कंपनी, अंधेरी येथे १५१ जणांचे लसीकरण.
६. खार : टिप्स कंपनी, खार येथे २०६ लोकांचे लसीकरण.
७. मालाड : मालाड येथील बँक ऑफ बडोदा येथे ४० लोकांचे लसीकरण.
.....................................................